लोकसभेचे १७ खासदार कोरोना पॉझिटिव्ह !
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झालीय. परंतु, यापूर्वीच लोकसभेचे १७ खासदार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचं समोर आलंय. खबरदारीचा उपाय म्हणून संसद भवनात या सर्व खासदारांची १३ आणि १४ सप्टेंबर रोजी कोरोना चाचणी करण्यात आली होती. या कोरोना संक्रमित खासदारांमध्ये सर्वाधिक १२ खासदार सत्ताधारी भाजपचे आहेत. तर यात वायआरएस काँग्रेसच्या दोन, शिवसेना, डीएमके आणि राष्ट्रीय जनता दलाच्या एका-एका खासदाराचा समावेश आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ३५९ सदस्यांनी लोकसभेच्या कामकाजाला हजेरी लावल्याचं सांगण्यात आलंय.
खासदार मीनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे आणि प्रवेश साहिब सिंह वर्मा यांच्यासहीत एकूण १७ खासदार करोना पॉझिटिव्ह आढळलेत. यामध्ये सुखबीर सिंह, प्रताप राव जाधव, जनार्दन सिंह, हनुमान बेनीवाल, सेल्वम जी, प्रताप राव पाटील, रामशंकर कठेरिया, सत्यपाल सिंह यांचाही समावेश आहे.
पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होण्यापूर्वीच सर्व खासदार आणि कर्मचारी आपली कोविड चाचणी करतील, असा नियम बनवण्यात आला होता. कोविड चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना संसद परिसरात प्रवेशाची परवानगी देण्यात आली. करोना चाचणीचा अहवाल हा ७२ तासांहून अधिक वेळापूर्वीचा नसावा, असाही नियम आहे. खासदारांना हजेरी लावण्याची पद्धतही बदलण्यात आली आहे. आता खासदारांना ‘अटेन्डन्स रजिस्टर’ अॅपद्वारे आपली उपस्थिती नोंदविता येणार आहे. लोकसभेत खासदारांच्या बाकड्यावर काचेची शील्ड लावून सुरक्षा प्रदान करण्यात आलीय. बहुतेक खासदार आपल्या जागेवर बसूनच आपलं म्हणणं मांडत आहेत.