राज्यातील जळगावसह ९ आरटीओ कार्यालयांचा दर्जा वाढला
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यातील जळगावसह ९ ठिकाणी डेप्युटी आरटीओ कार्यालयांचा दर्जा वाढला असून त्याचे आरटीओ अर्थात प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुपांतर करण्यात आले आहे. धुळे आरटीओच्या नियंत्रणात असलेले पुरनाड व चोरवड चेकपोस्टही जळगावच्या अख्त्यारित आले आहे. त्याशिवाय ड्रायव्हिंग स्कूलची मान्यता तसेच वर्ग तीन व वर्ग ४ च्या बदल्यांचे अधिकारी जळगावला आरटीओला प्राप्त झालेले आहे.
जिल्ह्याचा वाढता विस्तार, वाढीव लोकसंख्या व वाहनांची संख्या पाहता राज्यातील ९ डेप्युटी आरटीओ कार्यालयांचे आरटीओ अर्थात प्रादेशिक परिवहन कार्यालय मंजुरीचा आदेश शासनाने २३ जून रोजी जारी केला. त्यात जळगाव, पिंपरी-चिचवड, सोलापुर, अहमदनगर, चंद्रपूर, अकोला, बोरीवली (मुंबई) व सातारा येथील उपप्रादेशिक कार्यालयांचा समावेश आहे. येथे शुक्रवारपासून आरटीओ कार्यालय संबोधले जाणार आहे. या सर्व कार्यालयांमध्ये शासनाने ४ हजार ११६ नियमित तर २०४ पदे बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करण्यास आकृतीबंध मंजूर केला आहे. २३ जून रोजी पदांचा सुधारित आकृतीबंधही मंजूर झालेला आहे.
जळगावला नवीन १०० पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर
नव्या निर्णयानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी १, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी १, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी ४, मोटार वाहन निरीक्षक २४, लेखाधिकारी १, प्रशासकीय अधिकारी १, सहायक मोटार वाहन निरीक्षक ३०, लघुलेखक (निम्नश्रेणी) १, कार्यालय अधीक्षक ३, वरिष्ठ लिपिक १०, लिपिक टंकलेखक २०, वाहन चालक ४ असे एकूण १०० पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर झालेलाा आहे.
धुळ्याचे अधिकारी गोठविले
जळगावला सध्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय होते. धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अख्त्यारित जळगावचा समावेश होता. ड्रायव्हींग स्कूलच्या मान्यतेसाठी धुळ्याला जावे लागत होते, ती मान्यता आता जळगावलाच मिळणार आहे. त्याशिवाय पुरनाड व चोरवड चेकपोस्टवर धुळे आरटीआचे नियंत्रण होते, ते अधिकार आता गोठविण्यात आले असून जळगाव कार्यालयाचे त्यावर नियंत्रण असणार आहे. पदे पुनर्स्थापित करण्यात आलेले असून प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे पद मात्र रिक्त आहे. या पदाचा पदभार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्याकडेच सोपविण्यात आले आहेत.