मोठी बातमी : दिवसा साठी आणि रात्रीसाठी विजेचे दर असणार वेगळे
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। वीज ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. केंद्र सरकार वीज दर निश्चित करण्यासाठी ‘टाईम ऑफ डे’ (TOD) नियम लागू करण्याची शक्यता आहे. जर असे झाल्यास देशभरातील वीज ग्राहकांना दिवसाच्या वेळेत विजेच्या वापराचे व्यवस्थापन करून त्यांच्या वीज बिलात 20 टक्क्यांपर्यंत बचत करता येणार आहे. टीओडी प्रणालीचा ग्राहक आणि वीज पुरवठादारांना निश्चितच फायदा होईल, असा विश्वास केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांनी व्यक्त केला आहे.
नवीन प्रणाली अंतर्गत दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेसाठी विजेचे वेगवेगळे दर लागू होतील. या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे ग्राहकांना ज्या वेळेला वीजेचे दर जास्त असतील त्या वेळेस जास्त वीज वापरणारी कामे टाळता येणार आहेत. टीओडी शुल्क प्रणाली १ एप्रिल २०२४ पासून १० kW आणि त्याहून अधिक मागणी असलेल्या व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी लागू होणार आहे. त्यानंतर शेती वगळता इतर सर्व ग्राहकांसाठी हा नियम १ एप्रिल २०२५ पासून लागू होईल.
ऊर्जामंत्र्यांनी सांगितले की, औष्णिक आणि जलविद्युत सोबतच रात्रीच्या वेळी गॅसवर आधारित क्षमतेचा वापर केला जातो. सौर उर्जेच्या तुलनेत ते खूप महाग आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आजच्या वीज दरावर दिसून येईल. २०३० पर्यंत नॉन-जीवाश्म इंधनांपासून आणि २०७० पर्यंत शून्य उत्सर्जन लक्ष्य पूर्ण करण्याच्या दिशेने या हालचालीमुळे त्याला मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
वीज दर प्रणालीमध्ये दोन बदल
ऊर्जा मंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारने वीज नियम, २०२० मध्ये सुधारणा करून विद्यमान वीज दर प्रणालीमध्ये दोन बदल केले आहेत. हे बदल टाइम ऑफ डे (TOD) दर प्रणालीचा परिचय आणि स्मार्ट मीटरशी संबंधित तरतुदींच्या तर्कसंगतीकरणाशी संबंधित आहेत.
वेगवेगळ्या वेळी वेगळे दर
टीओडी प्रणालीमुळे दिवसभरात एकाच दराने विजेसाठी शुल्क आकारण्याऐवजी, वापरकर्त्याने विजेसाठी भरलेली किंमत दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी बदलेल. निवेदनानुसार, नवीन दर प्रणाली अंतर्गत, दिवसातील आठ तास विजेचे दर सामान्य दरापेक्षा १० ते २० टक्के कमी असतील, तर जास्त वापराच्या वेळी १० ते २० टक्के जास्त असतील.