यूपीएच्या अध्यक्षपदा बाबत शरद पवारांच मोठं विधान
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यूपीएचे (UPA)अध्यक्ष व्हावे अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. शिवसेनेकडूनही ही मागणी सातत्याने होत असते. राष्ट्रवादीच्या युवक आघाडीने तर पवारांना यूपीएचे अध्यक्ष करण्याचा ठरावही केला. परंतु, या विषयावर शरद पवार यांनी आज पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. मला यूपीएच्या अध्यक्षपदात काहीच रस नाही, असं विधानच शरद पवार यांनी केलं आहे. त्यामुळे यूपीएचं अध्यक्षपद काँग्रेसकडे आणि पर्यायाने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडेच राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
पवार यांनी यूपीएच्या अध्यक्षपदात रस नसल्याचं सांगितलं असलं तरी देशातील सर्व विरोधकांची एकजूट करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. कोल्हापूर येथे आले असता पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारताना पवारांनी ही खुलासा केला आहे. मला काही यूपीएचं नेतृत्व नको आहे. आमच्या तरुणांनी ठराव केला यूपीएच्या अध्यक्षपदासाठीचा. मला त्यात यत्किंचित रस नाही. मी त्यात पडणार नाही. ही जबाबदारी मी घेणार नाही. पण एकत्र येऊन काही पर्याय देण्याचा कुणी प्रयत्न करणार असेल तर त्यांना सहकार्य शक्ती आणि पाठिंबा आणि मदत या सर्व गोष्टीला माझी तयारी आहे. त्या गोष्टी आम्ही करत असतो, असं शरद पवार म्हणाले.
काँग्रेस पक्ष सोबत हवाच
विरोधी पक्षाने एकत्र यावं असं म्हटलं जातं. पण त्यातील वास्तव गोष्टी दुर्लक्षित करून चालणार नाही. ममता बॅनर्जी यांचा पक्ष बंगालमध्ये शक्तीशाली आहे. त्या सत्तेत आहेत. त्यांना लोकांचा पाठिंबा आहे. बाकीच्या पक्षांची राज्या राज्यात शक्तिकेंद्र आहेत. काँग्रेस सत्तेत नसेल पण देशात सर्व ठिकाणी काँग्रेस कमी जास्त प्रमाणात आहे. प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आहे. गावात आहे. जो पक्ष व्यापक आहे. त्या पक्षाला घेऊन पर्यायी काही करायचं असेल तर ते वास्तवाला धरून होईल. आमचे मित्रं पक्ष काही करत असेल तर त्यातून चांगलं निर्माण होईल, असं ते म्हणाले.