राज्य राखीव दलाचे जामखेड मतदारसंघात हलवलेले प्रशिक्षण केंद्र आता वरणगावातच !
जळगाव (प्रतिनिधी)। भुसावळ तालुक्यातील हतनूर-वरणगाव येथे मंजुरी मिळालेले राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्र २६ जून २०२०च्या निर्णयाने कुडसगाव जामखेड मतदारसंघात स्थलांतरीत करण्यात आले होते. यामुळे जिल्ह्यात संतापाची लाट होती व राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना हे केंद्र वरणगाव असावे अशी मागणी करणारे निवेदन पत्र दिले होते. याबद्दल काल राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकी नंतर ना.गुलाबराव पाटील यांनी केंद्राबाबतचा मुद्दा गुरुवारी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे उपस्थित करून याबाबत चर्चा केली. या बैठकीत राज्य राखीव दलाच्या १३०३ बटालियनचे प्रशिक्षण केंद्र हे हतनूर-वरणगाव येथेच होणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. यामुळे जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.