अंतराळ संशोधनातील मोठी घटना, पुण्यातील शास्त्रज्ञांनी लावला मृत आकाशगंगेचा शोध
संपूर्ण आकाशगंगाच कृष्णविवराने गिळंकृत केल्यावर त्यातील इलेक्ट्रॉनच्या वारंवारितेमुळे रेडिओ तरंग उत्सर्जित होतात. अशा आकाशगंगाचे अवशेष सापडणे तसे दुर्मिळ असते.
पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या खोडद येथील जगातल्या सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बीण प्रकल्पाच्या अर्थात जीएमआरटीच्या मदतीने पुणे येथील एनसीआरएच्या शास्त्रज्ञानी दुर्मिळ अशा मृत आकाशगंगेचा शोध लावला आहे. ‘जे 1615+5452’ असं या आकाशगंगेच नाव आहे.
या आकाशगंगेच्या अवशेषांतून रेडिओ लहरींचे उत्सर्जन होत आहे. या संदर्भातले संशोधन राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकशास्त्र केंद्राच्या(एनसीआरए) डॉ.सी.एच ईश्वरचंद्रा आणि आफ्रिकेतील डॉ.झारा आर यांनी केले आहे. ते नुकतेच प्रकाशित झालेल्या ‘आर्काईव्ह’ या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे.
संपूर्ण आकाशगंगाच कृष्णविवराने गिळंकृत केल्यावर त्यातील इलेक्ट्रॉनच्या वारंवारितेमुळे रेडिओ तरंग उत्सर्जित होतात. अशा आकाशगंगेचे अवशेष सापडणे तसे दुर्मिळ असते. पण, त्याचबरोबर तिचा अभ्यास करण्याचे आव्हानही असते. या शास्त्रज्ञानी पुणे जिल्ह्यातील खोडद येथील जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप(जीएमआरटी) आणि साऊथ आफ्रिकन ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्झवेटरीच्या सहाय्याने तिचा शोध घेतला आहे.
या आकाशगंगेचे वैशिष्ठ म्हणजे, तिचा विस्तार 3 लाख प्रकाशवर्षं आहे, 7.6 कोटी वर्ष तीच वय आहे, 150 ते 1400 मेगाहर्टझ लहरींचे तिच्यातून उत्सर्जन होत आहे आणि सुमारे 30 टक्के भाग अजून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
या संशोधनामुळे आकाशगंगा, कृष्णविवरांच्या उत्क्रांतीचा काळ समजण्यास मदत होण्यास मदत होईल आणि खगोलशास्त्रातील संशोधनाला चालना मिळेल. यासोबत देशातील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी अधिक माहिती उपलब्ध होईल.
‘खोडद येथील जीएमआरटी रेडिओ दुर्बीण खूप संवेदनशील असल्याने मिळणारी माहिती अचूक व महत्त्वाची असते. महणूनच अशा प्रकारचे शोध लागले आहेत. यापुढील काळातही भारतीय जीएमआरटी रेडिओ दुर्बीण अनेक शोध लावण्यात यशस्वी होईल’, अशी माहिती जीएमआरटीचे वरिष्ठ प्रशासन अधिकारी डॉ.जे के सोळंकी यांनी दिली.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा