‘…आणखी ४८ तास बाकी आहेत’, चंद्रकांत पाटलांनी नेमके कसले संकेत दिले?
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पुणे, मंडे टू मंडे वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. नुकतंच एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांचा भावी सहकारी असा उल्लेख केलेला असताना आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा सूचक असं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात नेमकं काय घडतंय याविषयी राज्यातील जनतेमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 16 सप्टेंबर रोजी पुण्यात असं वक्तव्य केलं होतं की, ‘माजी मंत्री म्हणून माझा उल्लेख करू नका. दोन-तीन दिवसात काय ते कळेल.’ त्यांच्या याच वक्तव्यानंतर राज्यात विविध चर्चांना उधाण आलं. असं असताना दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील भाजपला अप्रत्यक्षरित्या खुणावलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्यावर आज (17 सप्टेंबर) चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा सूचक आणि अतिशय मोठं विधान केलं आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी केलेल्या सूचक वक्तव्याबाबत चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, ‘मी बोलून फक्त 24 तासच झाले… बघा 24 तासानंतरच ते बोलले आणखी 48 तास शिल्लक आहेत.’ असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं आहे.
मात्र, यावेळी चंद्रकांत पाटलांनी हे देखील स्पष्ट केलं की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेण्याएवढा मी मनकवडा नाही. त्यामुळे सध्या मला तरी माहित नाही ते असं का म्हणाले.’ पुढील दोन-तीन दिवसात काय होतं ते पाहा असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फोडलं. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं. की, ‘मला असं समजलं आहे की, चंद्रकांत पाटील यांना नागालँडचं राज्यपाल करणार आहेत.’ राऊतांच्या या टीकेला आज चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. ‘संजय राऊत यांना अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठविणार असल्याचं मला समजतं आहे. संजय राऊत यांना कोणी फार सीरियसली घेत नाही.’ असा टोला चंद्रकांत पाटलांनी हाणला आहे.