ऐनपूर – निंभोरा रस्त्यावर पसरले खड्डयांचे साम्राज्य…त्वरित खड्डे बुजविण्याची मागणी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी):- ऐनपूर ते निंभोरा या महत्वाच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी जागोजागी खड्डे पडले असल्याने जणू काही खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसत आहे.
वाहन धारकांना खड्डयांमुळे आपला जीव मुठीत घेवून तारेवरची कसरत करत या रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो.अनेक वेळा या रस्त्यांवर किरकोळ स्वरूपाचे अपघात होत असतात.खड्डेमय झालेला रस्ता जणू काही अपघातास आमंत्रण देणारा ठरत आहे.रस्त्यावर पडलेल्या मोठ मोठ्या खड्डयांमुळे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.झोपेचे सोंग घेतलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागास जाग येणार कधी ?. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्याची झालेली अत्यंत बिकट अवस्था नेहमी पहावयास मिळते, जैसे थे ची परिस्थिती असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डे बुजविण्याचा अद्यापही मुहूर्त मिळत नसल्याने प्रवाशी वर्गाच्या व वाहनचालकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे चित्र यावरून स्पष्टपणे दिसून येत आहे.तसेच संबंधित अधिकारी वर्गाचे ठेकेदारांवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने शासकीय नियमानुसार व इस्टीमेट प्रमाणे कामे होत नसल्याने ठेकेदारांच्या मनमानी प्रमाणे काम होत असतात त्यामुळे थातुर मातुर पद्धतीने केलेली कामे काही दिवसातच आपले अंतरंग दाखवितात देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराची असून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याची तसदी घेतांना दिसत नाही.
यासर्व गोष्टी चा त्रास मात्र प्रवाश्यांना आणि वाहन चालकांना निमूटपणे सहन करावा लागतो.खड्डे चुकवत असताना अनेक वेळा अपघात घडण्याची शक्यता असते त्या मुळे लोकांचे नाहक बळी जात असून या गंभीर बाबी कडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देवून त्वरित खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी प्रवाशांनी व वाहनचालकांनी केली आहे.