कानपुर एन्काऊंटर आरोपी कुख्यात गुंड विकास दुबेला उज्जैनमध्ये अटक
उज्जैन: कानपूरच्या बिकरू गावात ८ पोलिसांची हत्या केल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून फरारी असलेला कुख्यात गँगस्टर विकास दुबे याला अखेर अटक (Vikas Dubey arrested) करण्यात आली आहे. उज्जैनमधील महाकाल मंदिरातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. मंदिराच्या सुरक्षा यंत्रणेने त्याला ताब्यात घेतले आहे.
कानपूर एन्काउंटरमधील (kanpur encounter) मोस्ट वॉन्टेड विकास दुबेला मध्य प्रदेशातील उज्जैन येथून आज अटक केली. विकास दुबेने महाकालेश्वर मंदिरात पावती फाडली असे सांगण्यात येत आहे. सध्या स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी विकास दुबेच्या अटकेला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, याआधी पोलिसांनी विकास दुबेच्या तीन सहकाऱ्यांना चकमकीत ठार केले आहे. तर बुधावारी विकास दुबेचा डावा हात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमर दुबेलाही ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने बुधवारी सकाळी हमिदपूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत अमर दुबेला ठार केले आहे. पोलीस हत्याकांड प्रकरणात अमर दुबेदेखील आरोपी होता. पोलिसांना मोस्ट-वॉण्टेड आरोपींची एक यादी काढली असून यामध्ये अमर दुबेचे नाव पहिल्या क्रमांकावर होते.