कोरोनाच्या नव्या विषाणूच्या धास्तीने शाळा सुरू करण्यावर प्रश्नचिन्ह
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। कोरोनाच्या नव्या विषाणूने जगात पुन्हा हाहाकाराला सुरुवात केली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही भीती व्यक्त केली,राज्य सरकारने नुकताच १ डिसेंबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून,नव्या कोरोनाच्या धास्तीने शाळा सुरू करायच्या की नाही, यावर उद्या निर्णय होणार आहे. देशातही अनेक ठिकाणीरुग्ण वाढत आहेत. हे पाहता राज्य सरकारने नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
आता आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर केला जाईल. त्यानुसार सर्व आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांना सामान्य वेळेनुसार किंवा स्थानिक किंवा इतर सक्षमांनी ठरविलेल्या नियमानुसार परवानगी दिली जाईल.
कोविडच्या नियमांचे पालन नाही केल्यास मार्गदर्शक तत्त्वानुसार दंड आणि कारवाई केली जाणार आहे. एखादा कार्यक्रम असेल व येणाऱ्यांची संख्या 1 हजार पेक्षा जास्त असेल, तर त्याची माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला द्यावी लागेल. निर्बंध कडक करता येतील. मात्र, त्यानुसार 48 तास अगोदर माहिती देण्यात येईल. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस होऊन 14 दिवस झालेल्या व्यक्तीचेच लसीकरण झाल्याचे समजण्यात येईल. त्यात दुसऱ्या डोस काही वैद्यकीय कारणामुळे घेतला नसेल, तर त्यासाठी मान्यता प्राप्त डॉक्टरांचे प्रमाणपत्र लागेल. फक्त 18 वर्षांखालील व्यक्तीला लसीकरणातून सूट असेल.
संस्था, कॅम्पस आणि इतर ठिकाणीही कोविड नियमाचे पालन करावे लागेल. नियमाचे पालन करत नसतील, तर त्यासाठी संस्थेला सुद्धा जबाबदार धरण्यात येईल, दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या नव्या आणि सर्वाधिक धोकादायक विषाणूमुळे मुंबई महापालिकेने दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला क्वारंटाईन करावे, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.