कोविड-19 टेस्ट मध्ये फिक्सिंग! २,५०० रूपये द्या, कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह मिळवा!
नवी दिल्ली: जगभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. रशियाला मागे टाकत आता जगातील आकडेवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे जास्तीत जास्त कोरोना चाचणीवरही भर दिली जात आहे. मात्र अशापरिस्थितीत एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील मेरठ येथून समोर आला आहे. २,५०० रूपये द्या, कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह मिळवा..अशी ऑफरच उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये सुरू आहे. म्हणजेच आता कोरोना तपासणीतही फिक्सिंग होत आहे. अशाच प्रकारचा दावा करणार्या खासगी रुग्णालयाच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये रुग्णालयातील कर्मचारी २ हजार ५०० रुपये द्या आणि कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट मिळवा, असे सांगताना दिसत आहेत. एवढेच नाही तर या रिपोर्टवर सरकारी रुग्णालयाचा शिक्काही देण्यात येणार असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. सध्या या खाजगी रुग्णालयातविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कारवाईत आलेल्या आरोग्य विभागाने खासगी रुग्णालय आणि तिथल्या व्यवस्थापकाविरूद्ध लिसाडी गेट पोलिस ठाण्यात दोन कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारने सीएमओकडून हा अहवाल अत्यंत गंभीर बाब असल्याने चौकशीचे आदेश दिले आहे. दुसरीकडे, अनेक खासगी रुग्णालयांमध्ये असा प्रकार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. रात्री उशिरा डीएम यांनी परवाना मागे घेण्यासह रुग्णालय सील करण्याचे निर्देश दिले आहे. शनिवारी हापूर रोडवरील तिरंगा गेटजवळील न्यू मेरठ रुग्णालयाच्या व्हिडिओमध्ये रुग्णालयाचे व्यवस्थापक शाह आलम गैरमार्गाने कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह देण्याती हमी देत आहेत. ते सांगत आहेत की जिल्हा रुग्णालयाच्या संगनमताने ही कोरोना चाचणी केली जाईल, त्यानंतर रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे दाखवण्यात येईल. सध्या या खाजगी रुग्णालयातविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, कोणाला असे रिपोर्ट देण्यात आलेत का? याची चौकशी केली जात आहे. मात्र हे रूग्णालय सध्या बंद केलं असल्याचेही सांगण्यात येत आहे.
न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, मेरठचे मुख्य वैद्यकीय अधिकारी राजकुमार सैनी यांनी व्हिडिओ झाल्यानंतर कारवाईचे आदेश दिले. हे रुग्णालय शाह आलम नावाच्या इसमाच्या मालकीचे असून, त्यांनी हा व्हिडिओ खोटा असल्याचे म्हटले आहे. शाह आलम यांनी आपल्या रुग्णालयाची बदनामी करण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला असल्याचे सांगितले. मेरठमध्ये आतापर्यंत १ हजार ११६ करोना पॉझिटिव्ह रुग्ण असून ६९ जणांचा मृत्यू झाला आहे.