खिर्डी खु. येथील नवीन गावठाण मध्ये गटारी अभावी नागरिकांचे आरोग्य धोक्यात…
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी): ख्वाजा गरीब नवाज नगर भागात गटारी नसल्याने दुर्गंधी युक्त घाण पाणी रहिवाश्यांच्या घराजवळ साचत असल्याने डबके तयार होवून पाणी ओसंडून रस्त्यावर वाहत आहे याकडे ग्राम पंचायत प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करीत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या भागात अगोदरच दैनंदिन साफ सफाई अभावी नेहमीच दुर्गंधी पसरलेली असताना त्यात घाण पाण्याची भर पडली आहे.त्यामुळे इतरांना स्वच्छतेचे शहाणपण शिकविणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाचर ढिसाळ नियोजन असल्याचे चित्र दिसून येत आहे.तसेच या भागात मोठी लोकवस्ती आहे.गेल्या कित्येक महिन्यापासून गटारी अभावी रस्त्यावरून दुर्गंधी युक्त पाणी वाहत असल्याने शालेय विद्यार्थी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.त्यामुळे नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत वारंवार ग्राम पंचायत प्रशासनास लेखी व तोंडी तक्रार करून देखील काही एक उपयोग होत नाही. ग्राम पंचायत कडे पैसे शिल्लक नाही निधी मिळाला नाही.शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे.अश्या प्रकारची उत्तरे दिली जातात .
येथे घाण पाण्याच्या डबक्यावर डासांचा मोठ्याप्रमाणावर उपद्रव वाढला असून साथरोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वॉर्ड क्रमांक १ मध्ये २ ते ३ उमेदवार निवडून येतात मात्र पाच वर्ष फक्त पोकळ आश्वासन देत वेळ मारून नेतात. कोणत्याही प्रकारची कामे व्यवस्थित करत नसून उंटावर बसून शेळ्या हकायची कामे इथे सुरू आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाश्यांनी मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी शी बोलताना व्यक्त केली