गावठी कट्टया प्रकरणी खडका परिसरात एकाला अटक !
भुसावळ (प्रतिनिधी) । खडका परिसरात एक संशयित आरोपी गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याने जळगाव स्थानिक गुन्हा शाखा व बाजारपेठ पोलीस स्टेशन यांच्या पथकाने छापा टाकून एका आरोपीस अटक केली आहे.
गावठी कट्टासह एक इसम खडका परिसरामध्ये असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, डीवायएसपी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. यात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, सहा. फौजदार राजेंद्र पाटील , पो. हे.कॉ. कमलाकर बागुल, रवींद्र पाटील, इद्रीस पठाण, बाजारपेठ पोलिस स्टेशनचे रमण सुरडकर, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींनी शनिवारी रात्री उशिरा संशयित आरोपी रोशन भीमराव सपकाळे (रा. खडका) या इसमास खडका-किन्ही रस्त्यावर पाण्याच्या टाकी परिसरात अटक करण्याची कारवाई केली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालु होते तर आरोपीस तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.