जम्मू काश्मीर: तीन दशकांत पहिल्यांदाच त्रालमध्ये दहशतवाद्यांचा सुपडा साफ !
पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात हिजबुल मुजाहिद्दीनच्या सर्व अतिरेक्यांना ठार करण्यात आलं आहे. त्यामुळे त्राल भागात आता हिजबुल मुजाहिद्दीनचा एकही दहशतवादी नाही आहे, असा दावा जम्मू-काश्मीर पोलिसांनी शुक्रवारी केला. १९८९ नंतर ही पहिलीच वेळ आहे. १९८९ मध्ये काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांनी ठाण मांडला होता. दरम्यान, सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या सर्व अतिरेक्यांना कंठस्नान घातलं आहे.
After today’s #successful ops, no presence of HM #terrorist in #Tral area. It has happened for first time since 1989: IGP Kashmir @JmuKmrPolice
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) June 26, 2020
दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राळच्या चेवा उल्लार भागात सुरक्षा दलाशी रात्रीच्या वेळी झालेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार केल्यानंतर पोलिसांनी हा दावा केला आहे. काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी काश्मीर क्षेत्र पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “आजच्या यशस्वी कारवाईनंतर त्राल प्रदेशात आता हिजबुल मुजाहिद्दीन अतिरेकी नाही आहेत. १९८९ नंतर ही पहिलीच वेळ आहे.” काश्मीरमधील दहशतवादाच्या उद्रेकानंतर या भागात हिजबुल मुजाहिद्दीनचे वर्चस्व राहिलं. खोऱ्यात हजाराहून आधिक केडर होते. बुरहान वानी आणि झाकीर मुसा यांच्यासह संघटनेचे अनेक प्रमुख कमांडर त्राल प्रदेशातील होते.