जामनेरात संतप्त नातेवाईकांकडून साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची तोडफोड !
जामनेर (प्रतिनिधी)। येथील प्रसिद्ध साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची उपचार घेतलेल्या एका युवतीच्या मृत्यू प्रकरणी संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मोठी तोडफोड केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक असे की, दिपाली अर्जुन चौधरी (वय २२) राहणार प्रकाश नगर,जामनेर हि सुरेशदादा जैन फार्मसी कॉलेज, जामनेर येथे पदवी अभ्यासक्रमाला शिकत होती. तिला मानेच्या गाठीची समस्या असल्याने साई मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात ५ नोव्हेबर रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दुपारी त्याच दिवशी ४ वाजता मानेच्या गाठीवर चरबी असल्याचे सांगून तिचे ऑपरेशन साई हॉस्पिटलला करणात आले. त्यानंतर ५ नोव्हेंबरलाच पुढील उपचारासाठी संध्याकाळी ७ वाजता ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटल येथे दाखल केले. रविवारी ८ नोव्हेंबर रोजी तिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला सकाळी ९ वाजता औरंगाबाद येथे नेण्यात येत होते. सिल्लोडजवळ आल्यावर दिपालीची प्राणज्योत मावळली. त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी जामनेरात मृतदेह परत आणला. साई हॉस्पिटलला मृतदेह नेत डॉ. नाईक यांना जाब विचारण्यासाठी गेले. मात्र डॉ. नाईक हे सकाळपासून दवाखान्यात नाहीत हे कळल्यावर संताप आणखीच अनावर झाला. नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या खिडक्या, दरवाजे, स्वागत कक्ष व इतर भागांची मोठी तोडफोड केली. सदर घटनास्थळी पोलिस माहिती घेत असून चोख बंदोबस्त आहेत.