तिहेरी हत्याकांड; पैठणमध्ये पती, पत्नी, मुलीची निर्घृण हत्या
औरंगाबाद (प्रतिनिधी)। पैठण येथे गाढ झोपेत असलेल्या पती, पत्नी आणि मुलगी यांची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी पहाटे येथे घडली. या तिहेरी हत्याकांडाने औरंगाबाद जिल्हा हादरून गेला आहे. शहराजवळील जुने कावसान गावात घडलेल्या या हत्याकांडाचे कारण मात्र समजू शकले नाही.
राजू ऊर्फ संभाजी निवारे (वय 40), त्यांच्या पत्नी अश्विनी (35), मुलगी सायली (10, रा. जुने कावसान) अशी मृतांची नावे आहेत. मुलगा सोहम (6) हा हल्ल्यात जखमी झाला आहे. त्याच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू निवारे यांच्या पुतणीचे लग्न 9 डिसेंबर रोजी असल्यामुळे कपडे व इतर साहित्य खरेदीसाठी निवारे कुटुंबातील हे चौघे चारचाकी वाहनाने शनिवारी सायंकाळी औरंगाबादला आले होते. सर्व कपडे व वस्तू खरेदी झाल्यानंतर हे कुुटुंब रात्री बारा वाजता गावी परतले. जेवणानंतर सर्वजण झोपी गेले. रात्री तीनच्या सुमारास गाढ झोपेत असताना निवारे यांच्या घरात घुसलेल्या अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी कुटुंबावर हल्ला केला. यात राजू, अश्विनी आणि मुलगी सायली यांचा जागीच मृत्यू झाला. मुलगा सोहम हा जखमी झाला. या तिघांचाही मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर हल्लेखोरांनी घरातून पळ काढला.
जखमी सोहम घटनेनंतर रूमबाहेर रडत आल्यानंतर त्याच्या आवाजाने घरातील इतर लोक जागे झाले. सर्वांनी राजू यांच्या घराकडे धाव घेतली. तिघेही मृतावस्थेत पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर कुटुंबीयांना जबर हादरा बसला. त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती गावासह पैठण शहरात वार्यासारखी पसरली. त्यानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. यानंतर तत्काळ सोहमला औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, पैठण शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून तिघांवर कावसान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
आठ तपास पथके रवाना
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, ठसे तज्ज्ञ, श्वान पथकाने हल्?लेखोरांचा दूरपर्यंत माग काढला. परंतु, काही धागेदोरे मिळाले नाहीत. हल्?लेखोरांच्या शोधासाठी आठ पथके रवाना केल्याची माहिती पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी दिली. याप्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा