फैजपूरातील युनियन बँक ऑफ इंडियाचा कारभार ढेपाळला ; वेळेच्या एक तास अगोदर बँक बंद
फैजपूर (प्रतिनिधी): येथील युनियन बँक ऑफ इंडियाचा कारभार सध्या कमालीचा ढेपाळला आहे. येथील व्यवस्थापक जयराम टोकरे यांचे नियंत्रण कर्मचाऱ्यांवर नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार सुरू केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक कमालीचे वैैतागले आहे. बँकेची वेळ सकाळी ९ ते दुपारी ३ वाजे पर्यंत आहे. मात्र, बँकेचे कर्मचारी व अधिकारी मनमानी करत बँक वेळेच्या एक तास अगोदर दुपारी २ वाजता बंद करत असल्याने ग्राहक कमालीचे वैैतागले आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया ही गोरगरिब, सर्वसामान्य, शेतकरी व शेतमजुरांची बँक समजली जाते. या शाखेतील कर्मचारी ग्राहकांशी अरेरावी करून उद्धट वागणूक देत असून ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. येथील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कमालीची घटली असून त्याचा परिणाम बँकेच्या कामकाजावर होताना दिसून येत आहे. बँकेत आलेल्या ग्राहकांची कामे तडकपणे निपटवून मोकळी न करता बँकेत विनाकारण गर्दी जमविली जाते. आधीच ही बँक कमी जागेत चालविली जात असल्यामुळे गर्दी झाल्यास तेथे उभेसुद्धा राहायला जागा नसते. कामाची गती वाढविल्यास गर्दी त्वरित पांगविता येते, हे बँकेला वेगळे सांगण्याची गरज नाही.
कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे येथील ग्राहकांची हेळसांड होत आहे. या बँकेत मोठ्या प्रमाणात शहरी व ग्रामीण ग्राहकांचा भरणा असल्यामुळे बँकेत अनुभवी व कार्यक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे. असे झाल्यास येथील कर्मचाऱ्यांवर वचक राहिल, असे ग्राहकांकडून बोलले जात आहे. पासबुकात एंट्री करणे, नवीन खाते उघडणे, खाते उतारे, चेक कलेक्शन, विविध कर्ज प्रकरणे, फायनान्सची कामे घेऊन विविध ग्राहक बँकेत येतात. त्यांची कामे रेंगाळत असल्यामुळे त्यांना बँकेचे उंबरठे झिजवावे लागत आहे.
शेतकरी, शेतमजुर मजुरी बुडवून बँकेत कामानिमित्त येतात व त्यांना विविध कारणे सांगून परत पाठविले जाते. वृद्ध व निराधार ग्राहकांनादेखिल मनस्ताप सहन करावा लागत आहे. वृद्ध व निराधारांसाठी वेगळे काऊंटर ठेवण्यात यावे, अशी मागणी होत आहे. दररोज कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत असलेल्या या बँकेत वारंवार वीज व इंटरनेट सेवा खंडित होण्याचे प्रकारही घडत आहे. त्यामुळे ग्राहकांना विनाकारण ताटकळत राहावे लागते. असे प्रकार सध्या वाढीस लागले असून कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे.