बंद घरातून १५ लाखांची रोकड चोरट्यानी लांबविली !
पहूर, ता.जामनेर – जामनेर तालुक्यातील पहूर येथील ख्वाजानगर परिसरातील भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष शेख सलीम शेख गनी यांच्या बंद घरातून तब्बल १५ लाख रूपयांची रोकड लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
याबाबत माहिती अशी कि, भाजपा तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शे. सलीम शेख गनी राहणार पहूर, ख्वाजानगर हे गुरूवारी सकाळी ११ वाजता कुटुंबियांनसह जळगाव येथे नातेवाईकांकडे गेले होते. त्यांनी अलीकडेच प्लॉटचा व्यवहार केल्याने पंधरा लाखांची रक्कम घरात होती. ते जळगाव येथे मुक्कामी होते. दरम्यान शे. सलीम शेख गणी हे कुटुंबियांसह शुक्रवारी सायंकाळी घरी पोहचले असता त्यांना घराचा किचनचा दरवाजा उघडा दिसला. आत प्रवेश करून बघितले असता कपाटामधील १५ लाखांची रोकड न दिसल्याने घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले, दरम्यान शेख. सलीम शेख गनी यांनी पहूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यां विरूध्द भाग ५ गु.र.नं.२५८/२०२० भादंवि कलम ४५४,४५७,३८,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पाचोरा विभागाचे उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अमोल देवडे हे करीत आहेत.