भारताच्या दबावापुढे चीनी ड्रॅगन झुकला, गलवानमध्ये सैन्य मागे हटवले
नवी दिल्ली:
पूर्व लडाखमधील भारताचे कडक धोरण आणि दिलेल्या दोरदार प्रत्युत्तरामुळे चीनच्या आक्रमक पवित्र्यात आता नरमाई दिसू लागली आहे. गलवान खोऱ्यात भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पेइचिंगने भारतापुढे झुकत आपल्या सैनिकांना गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्ष झालेल्या जागेतून १. ५ किमी मागे हटवले आहे. तणाव कमी करण्याच्या उद्देशाने आता पर्यंत दोन्ही देशांदरम्यान कमांडर स्तरावर अनेक बैठका झाल्या आहेत. लडाखमधील तणाव निवळण्याचे नाव घेत नसल्याचे पाहून मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना जबाबदारी देण्यात आली होती.
गलवान खोऱ्यातील तणाव निवळण्यामधील चीनने उचललेले हे पहिले पाऊल असल्याचे जाणकार मानत आहेत. १५ जूनच्या रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष उफाळला होता. यात भारताचे २० सैनिक शहीद झाले होते. तर या संघर्षात चीनचे ४० जवान मारले गेल्याचे सांगण्यात येते. आज हाती आलेल्य वृत्तानुसार, पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनचे सैनिक डिसएन्गेडमेंट प्रक्रियेअंतर्गत १.५ किमी मागे हटले आहेत. या बाबत लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनी सैनिकांनी आपले कॅम्प देखील मागे हटवले आहेत. मात्र, याबाबत लष्कराकडून कोणत्याही प्रकारचे अधिकृत निवेदन आलेले नाही.
बफर झोन बनले गलवान खोरे
या बाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) दोन्ही देशांच्या सैन्याने रिलोकेशनवर आपली सहमती दर्शवली आहे. आशा प्रकारची घटना भविष्यात होऊ नये यासाठी आता गलवाल खोऱ्याचा बफर झोन बनवण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनी सैन्य किती मागे हटले याची पडताळणी झालेली नाही. गलवान खोऱ्यात चीनी सैनिक मागे नक्की हटलेत, मात्र ते किती मागे हटले याची पडताळणी केल्यानंतरच ते स्पष्ट होईल, अशी माहिती लष्करातील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली. ३० जूनला झालेल्या कोअर कमांडर स्तरावरील मिटिंगमध्ये पडताळणीची प्रक्रिया देखील ठरवण्यात आली होती. यात एक पूल उचलल्यानंतरच पुरावे पाहून दुसरे पाऊल उचलले जाईल असे ठरवण्याक आले होते. या पडताळणीसाठी तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. शिवाय पेट्रोलिंग पार्टी देखील प्रत्यक्षात पाहणी करेल. जेव्हा अशी पडताळणी होईल, तेव्हाच दुसरे पाऊल उचलले जाणार आहे, अशी माहिती वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा