मर्डर!ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर 10 वार करत चिरला गळा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई (प्रतिनिधी): भिवंडी शहरातील तीनबत्ती परिसरात असलेल्या हाफसन आळी परिसरात एका 38 वर्षीय महिलेची धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
ही घटना शनिवारी सकाळी घडली आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एक संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. मिळालेली माहिती अशी की, लक्ष्मी उर्फ पूजा भुरला ( वय-30 ) असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला ब्युटी पार्लरचा व्यवसाय करत असल्याची माहिती मिळली आहे. शनिवारी सकाळी ही महिला घरात एकटीच होती. अज्ञात मारेकरूने महिलेच्या घरात घुसून तिच्या शरीरावर धारदार शस्त्रानं 9 ते 10 वार करत गळा चिरून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. मयत महिलेचा मुलगा रात्रपाळीचे काम आटपून सकाळी घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उजेडात आला. मुलगा घरी आला तेव्हा घराला दरवाजा लॉक होता. त्यानं घराचा दरवाजा उघडून बघितलं असता घरात रक्ताच्या थारोळ्यात आईचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे मुलाला प्रचंड धक्का बसला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस व फॉरेंसिक लॅबचे पथक दाखल होऊन पंचनामा करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरु असून ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याची माहिती अद्याप समजू शकली नाही.