यावलराजकीय

राजकारणाची नवी समीकरणे,अमोल जावळेची कार्यक्रमात उपस्थिती ..! राजकारणात सक्रिय होणार का.?

यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील बोरावल येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात दिवंगत माजी आमदार व खासदार हरीभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांनी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अमोल जावळेनी विकास कामाच्या कार्यक्रमात हजेरी लावल्याने नवीन समीकरण उदयास तर येणार नाही ना ? अशी चर्चा सुरू झाली आहे.

भाजपचे माजी खासदार, आमदार तथा जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांच्या अकाली निधनानंतर भारतीय जनता पक्षाची धुरा नेमकी कुणाकडे जाणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली असतांना बोरावल येथील एका कार्यक्रमात अमोल जावळे नी हजेरी लावल्याने या बाबत चर्चा सुरू झाली असून हरीभाऊंचे चिरंजीव अमोल जावळे हे उच्चशिक्षीत असून कार्पोरेट क्षेत्रात वरिष्ठ पातळीवर काम करत आहेत. त्यांना भाजप पाठबळ देणार असल्याची चर्चा आहे . या पार्श्‍वभूमिवर शुक्रवारी सायंकाळी विकासकामांच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमातील त्यांची उपस्थिती चर्चेचा विषय बनणे स्वाभाविक आहे. कारण या व्यासपीठावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह भाजप व शिवसेनेचे तमाम पदाधिकारी उपस्थित असतांना अमोल जावळे यांची हजेरी , म्हणजे चर्चा ही रंगणारच … अमोल जावळे यांच्याशी संपर्क साधला असता, माझ्या बाबांचे सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी अतिशय सलोख्याचे संबंध होते. यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सोबतही आमचे अतिशय जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत. तसेच बोरावल येथील कार्यक्रम हा विकासकामांचा होता. यात माझ्यासोबत भाजपचे अनेक पदाधिकारी देखील होते. यामुळे माझ्या कार्यक्रमातील उपस्थितीचा कुणी राजकीय अर्थ काढू नये असे त्यांनी सांगितले. अर्थात, असे असले तरी अमोल जावळे यांची उपस्थिती हा चर्चेचा विषय बनली आहे .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!