राज्यात लवकरच शाळा पुन्हा सुरु होणार? आरोग्य मंत्र्यांचे मोठे विधान
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वाढत संसर्ग पाहता शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र या निर्णयाविरोधात अनेकांनी आवाज उठवला. याच निर्णयावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राजेश टोपे म्हणाले की, शाळा सुरु करण्याबाबत मंत्रीमंडळात चर्चा सुरु आहे. यात मुलांचे कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र शाळा सुरु करण्यासंदर्भात पालकांमध्ये दोन वेगळे मतप्रवाह आहेत. त्यामुळे शाळा सुरु करण्याबाबत 15 पंधरा दिवसात परिस्थिती पाहून निर्णय घेऊ असे टोपे म्हणाले. त्यामुळे राज्यातील शाळा लवकरंच सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लसीकरण मोहिमेच्या वर्षपूर्तीवर बोलताना टोपे म्हणाले की, आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ९० टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. 62 टक्क्यांपर्यंत लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. जे लोकं लस घेत नाहीत त्यांच्यासाठी जनजागृती करुन लस दिली जाईल.यात 15 ते 18 वयोगटातील 42 टक्के मुलांना आपण लस दिल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील किशोवयीन मुलांच्या लसीकरणासाठी लसीचे डोस अपुरे पडत असल्याचा दावा केला जात आहे. यावरचं आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना राजेश टोपे यांनी राज्यात लसींचा तुटवडा नसल्याचे म्हटले आहे. तसेच केंद्राकडूनही लस दिल्या जात नाही असं राज्य सरकारने म्हटले नाही असंही ते म्हणाले.
लसीकरण तुटवड्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, “15 ते 18 वयोगटातील मुलांना कोवॅक्सिन लस दिली जातेय. तसेच 60 वर्षावरील गंभीर आजाराशी सामना करणारे रुग्ण, फ्रंटलाईन वर्कर आणि आरोग्य कर्मचारी यांचा लसीकरणासाठी लागणाऱ्या लसींचे महिन्याचे नियोजन केले जाते. या नियोजनसाठी राज्याला ५० लाख कोव्हिशील्ड लस कमी पडत आहेत. तर कोवॅक्सिनचे ४० डोस कमी पडत आहे. हा महिन्याचा आकडा आहे. त्यामुळे महिन्याभरासाठी लागणारी लस उपलब्ध असावी त्यादृष्टीने केंद्राकडे केलेली ही मागणी आहे. या मागणीच्या दृष्टीकोनातून केंद्र आम्हाला लस उपलब्ध करुन देत नाही असं आम्ही म्हणत नाही. महिन्याचा साठा उपलब्ध असावा एवढीचं आमची यातील महत्त्वाची मागणी आहे.” असं ते म्हणाले.