लाच स्विकारताना तलाठी लाचलुचपत च्या जाळ्यात
जळगाव (प्रतिनिधी)। येथील मेहरूणचे तलाठी सचिन एकनाथ माळी यांना आज तक्रारदाराच्या अशिलाचे दुकान नावावर करून देण्यासाठी एक हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.
अधिक असे की, स्टँप वेंडर असणार्या तक्रारदाराला आपल्या एका अशिलाचे दुकान नावावर करायचे होते. यासाठी मेहरूण भागाचे तलाठी सचिन एकनाथ माळी यांनी एक हजार रूपयांची मागणी केली होती. परंतू तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार नोंदवली. यानुसार आज पथकाने सापळा रचत तलाठी सचिन एकनाथ माळी ( वय ३३,) यांना रंगेहात अटक केली. ही कारवाई एसीबीचे डिवायएसपी गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक निलेश लोधी, सहाय्यक फौजदार रविंद्र माळी,पोहेकॉ अशोक अहीरे, सुनिल पाटील, सुरेश पाटील, वंदना अंबीकार, शैला धनगर,सुनिल शिरसाठ, मनोज जोशी, जनार्दन चौधरी, प्रविण पाटील, नासिर देशमुख व ईश्वर धनगर यांच्या पथकाने केली.