२ हजार शेतकरी अनुदानापासून वंचित प्रांताधिकाऱ्याकडे भाजपाची तक्रार
यावल (सुरेश पाटील)। यावल तहसील कार्यालयातील संबंधित कर्मचारी आणि बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करीत खरीप 2019 चे अवकाळी नुकसानीचे अनुदान वाटप प्रक्रियेत गरजू लाभार्थी शेतकऱ्यांच्या नांवात आणि बँक खाते क्रमांकात अक्षम्य चुका केल्याने तालुक्यातील एकूण 2100 शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल्याने यावल शहर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी फैजपुर भाग उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्याकडे लेखी तक्रार केली. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी प्रांताधिकारी आपल्या महसुल कर्मचाऱ्यांसह बँक कर्मचाऱ्यांच्या विरोधात काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.
फैजपूर भाग उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्याकडे दिनांक 23/9/2020 रोजी भारतीय जनता पार्टी यावल शहर पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खरीप 2019 चे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला त्यावेळी तत्कालीन महाराष्ट्र मधील भाजप सरकारने शेतकऱ्यांना नुकसानीपोटी प्रती हेक्टरी 8 हजार रुपये प्रमाणे अनुदान मंजूर केले व निधी उपलब्ध करून दिला होता आणि आहे, निधी उपलब्ध झाले नंतर आपल्या शासकीय यंत्रणेमार्फत त्याचे वितरण करावयाचे होते परंतु यावल तालुक्यांमध्ये निधी वितरण करताना बराचसा मोठा घोळ झालेला आहे निधी वाटपात नांव एका व्यक्तीचे/शेतकऱ्याचे तर खाते क्रमांक दुसऱ्या व्यक्तीचा / शेतकऱ्याचा दिला गेला(या घोड़ चुका कोणी का केल्या) आज पर्यंत साधारण 2100 शेतकऱ्यांना निधी मिळालेला नाही, आपल्या कार्यालयाकडून माहिती घेतली असता निधी हा मुदतीच्या आत शासनास परत पाठविला आहे त्यामुळे तालुक्यातील 2100 शेतकऱ्यांना विनाकारण तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहे व मनस्ताप सहन करावा लागत आहे सदर निधी हा कशासाठी परत पाठविण्यात आला तसेच अनुदान वाटपामध्ये निष्काळजीपणा व हलगर्जीपणा आणि संबंधितांनी कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून येते त्यामुळे या कर्मचाऱ्यांची चौकशी करून संबंधित कर्मचारी व यावल तहसीलदार यांची चौकशी होऊन कडक कारवाई करावी अन्यथा यावल तालुका भारतीय जनता पार्टी पंधरा दिवसानंतर प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचे यावल शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, यावल पंचायत समितीचे माजी सभापती भरत महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, अनंत नेहेते, मच्छिंद्र चौधरी, किशोर पाटील, परेश नाईक, संजय सराफ यांनी आपली स्वाक्षरी करून दिला आहे.
चुका करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून शेतकऱ्यांना अनुदान वाटप करायला पाहिजे-
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे अनुदान वाटप करताना ज्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावांमध्ये आणि बँक खाते क्रमांकामध्ये अक्षम्य चुका केल्या त्यांच्या वेतनातून शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वाटप करावी जेणेकरून भविष्यात शासकीय कामकाजात ते कर्मचारी अशा चुका करणार नाहीत.असे यावल तालुक्यातील शेतकरी वर्गात बोलले जात आहे.