अजितदादांच्या जोरबैठका सुरू, मुख्यमंत्री मातोश्रीत !
मुंबई : अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मैदानात उतरून कोरोनाशी दोन हात करत असताना तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारचा कारभार सध्या तीन दिशेला सुरू असल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीतून कारभार हाकत आहेत तर मंत्रालयात प्रशासकीय अधिकारी ‘झूम’ बैठकांत व्यस्त आहेत. यावेळी मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारच दिवसभर मंत्रालयात बसून राज्याचा कारभार सहाव्या मजल्यावरून हाकताना दिसताहेत. दादांच्या रोजच्या जोर-बैठकांमुळे हे सरकार कार्यरत असल्याचे दिसत आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे देशाचे प्रमुख अर्थचक्र असलेल्या महाराष्ट्राचा कारभार ठप्प झाला आहे. यातच आर्थिक राजधानी मुंबईत ‘मिशन बिगिन अगेन’ सार्थकी लागून महाराष्ट्राला उभारी देईल, अशी आशा वाटत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशी घोषणा करून वातावरणनिर्मिती केली खरी, पण या घडीला ठाकरे सरकारचा कारभार बघता या सरकारची तीन तोंडे, तीन दिशेला दिसत आहेत. त्यामुळे याचा मोठा परिणाम राज्याच्या कारभारावर झाला असल्याचे समोर येत आहे. २२ मार्चला लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मागील १०० दिवसांत सुमारे १२हून अधिक कॅबिनेट बैठका झाल्या आहेत.
मात्र, सह्याद्रीवरील नाममात्र बैठकांचा अपवाद वगळता मुख्यमंत्री ठाकरे मंत्रिमंडळाच्या बैठकांना हजर न राहता मातोश्रीवरून व्हिडिओकॉन्फरन्सद्वारे मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होतात. हे कमी म्हणून की काय विरोधीपक्षांच्या बोलावलेल्या बैठकीलाही मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर असूनही हाकेच्या अंतरावर असलेल्या मंत्रालयात आले नव्हते. ८ जुलैच्या मंत्रिमंडळ बैठकीलाही मुख्यमंत्री मंत्रालयात हजर नव्हते.
काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असल्यास तिन्ही पक्षांचे नेते आणि मंत्री मातोश्रीवर जाऊन उद्धव यांना भेटत आहेत. पोलीस अधिकार्यांच्या बदल्या, दोन किलोमीटरच्या परिघाबाहेर लोकांना न सोडण्याचा निर्णय, जप्त केलेली वाहने, सनदी अधिकार्यांची मनमानी आणि काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना विश्वासात न घेता घेतलेले निर्णय यामुळे महविकास आघाडीत गेल्या काही दिवसांत धुमशान सुरू आहेे. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घेऊन हे धुमशान तात्पुरते तरी थांबवले आहे
हा सगळा गोंधळ सुरू असताना अजित पवार मात्र दररोज न चुकता मंत्रालयात सहाव्या मजल्यावर येऊन आपल्या नेहमीच्या कार्यशैलीने वेगवान कारभार करताना दिसतात. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मोठ्या संख्येने मंत्री, नेते,आमदार आणि सनदी अधिकारी दिसत असून सकाळी सुरु झालेले दादांचे काम संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू असते. मुख्य म्हणजे लोकही दादांना भेटून आपले प्रश्न सोडवून घेतात. मंत्रालयात नऊच्या सुमारास येऊन ते कारभार चालवत आहेत. सोशल डिस्टन्सिंग, जागोजागी सॅनेटायजरने भेटायला आलेल्या प्रत्येकाचे काम तडीला नेण्यासाठी संबंधितांना फोनवरुन आदेश देताना दादा बुधवारी आणि गुरुवारी मंत्रालयात दिसत होते.