अस्ताव्यस्त वाढलेले केस शिस्तीत येणार! राज्यात सलून व जिम ला परवानगी !
मुंबई (प्रतिनिधी)।
गेल्या ३ महिन्यांपासून राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सलून आणि जिम बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे कटिंग नसल्यामुळे अनेकांच्या डोक्यावरचा केशसंभार अस्ताव्यस्त झाल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र, आता या पसरलेल्या केसांना शिस्तीत आणण्याचा मार्ग मोकळा झाला असून येत्या २८ जूनपासून राज्यभरातले सलून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितलं. सलूनसोबतच जिम देखील सुरू करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, असं करताना अटी आणि शर्थींचं पालन करणं अनिवार्य असेल, असं देखील त्यांनी सांगितलं. दरम्यान, सलून उघडण्यास परवानगी मिळाली असली, तरी ब्युटी पार्लर आणि स्पा उघडण्यासंदर्भात अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.
फक्त केस कापायला परवानगी –
राज्यात २० मार्च रोजी लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर तेव्हापासून सर्वच सलून बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे तीन महिने केस न कापल्यामुळे अनेकांच्या डोक्यावर केसांचं जंजाळ वाढलेलं पाहायला मिळत होतं. याशिवाय सलून व्यवसायिकांनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. व्यवसाय बंद असल्यामुळे आर्थिक स्थिती खालावली असून व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नाभिक संघटनांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला आहे. यावेळी सलूनमध्ये फक्त केस कापायला परवानगी देण्यात आली असून इतर सेवांसाठी अद्याप परवानगी देण्या आलेली नाही. याशिवाय, केस कापणारा आणि ग्राहक अशा दोघांनाही मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
लॉकडाऊनमुळे होत असलेल्या आर्थिक नुकसानाच्या विरोधात सलून व्यावसायिक आक्रमक झाले होते. नाशिक, उल्हासनगर, पुणे अशा राज्याच्या काही भागांमध्ये सलून व्यावसायिकांनी आंदोलन देखील केलं होतं. १८ जून रोजी राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील नाभिक समाजाच्या व्यावसायिकांना मदत करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली होती. या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाचं नाभिक व्यावसायिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.