कालच्या सभेला मुद्दाम डावलण्यात आले- पल्लवी सावकारे
भुसावळ (प्रतिनिधी)। जिल्हा परिषदेच्या काल झालेल्या महत्वाच्या सभेला सभा संपल्यानंतर उशीरा लिंक पाठवून मुद्दाम डावलण्यात आल्याचा आरोप आपल्या आक्रमक शैलीत जि.प. सदस्या पल्लवी सावकारे यांनी केला आहे.
काल १४ रोजी सकाळी ११ वाजेला जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन या महत्त्वाच्या समितीची ऑनलाइन सभा घेण्यात आली, सभेची लिंक १ दिवस आधी लिंक शेयर करणे गरजेचे असते परंतु जिल्हा परिषदेकडुन सभा संपल्यानंतर लिंक पाठवण्यात आल्याचा आरोप समितीच्या सदस्या पल्लवी सावकारे यांनी केला आहे. तसेच जलव्यवस्थापन समितीची सभा अवघ्या १५ मिनिटात आटोपण्यात आली. लिंक ओपन करण्यापूर्वीच सभा संपल्याचे जाहीर करण्यात आल्याने यात काही तरी गौडबंगाल असल्याचा त्यांचा आरोप आहे. याआधी त्यांनी अनेकदा अधिकारी व पदाधिकार्यांना धारेवर धरले असल्याने यामुळे या सभेसाठी आपल्याला जाणीवपूर्वक डावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी पत्र देऊन सुद्धा जलसंधारण विभागाकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत असून वाळू पावत्या आणि रॉयल्टीसंदर्भात जिल्हा परिषद सदस्या म्हणून मी माहिती मागवली आहे. संबंधित विभागाकडून ही माहिती दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महत्त्वाचे म्हणजे हीच माहिती एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला अवघ्या तासाभरात देण्यात आल्याने या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.