कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करण्याच्या प्रयत्नांना बळकटी मिळेल – खा. रक्षाताई खडसे
भुसावळ :– तालुक्यातील साकरी येथील शेतकऱ्यांशी कृषी विधेयकाविषयी संवाद साधताना खासदार रक्षाताई खडसे यांनी माहिती दिली. कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या दृष्टीने कसे चांगले व हितकारक आहे यासंदर्भात शेतकऱ्यांसोबत चर्चा करून शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व शेतकऱ्यांच्या फायद्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही मालाची खरेदी विक्री करता येईल. कृषिमालाच्या राज्यांतर्गत व आंतरराज्य हालचालीतील अडथळे दूर होण्यास मदत करण्यात येईल. मार्केटिंग आणि वाहतूक खर्च कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगली किंमत मिळेल. ई ट्रेडिंगसाठी व्यवस्था उपलब्ध होईल. आपल्या पिकासाठी घाऊक विक्रेते, प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा कंपनीशी करार करता येईल. त्यासाठी किंमतही ठरवता येईल. बाजारपेठमधील अस्थिरतेचा भार शेतकऱ्यांवर न राहता त्यांच्या कंत्राटदारावर राहील.
मध्यस्थांना दूर केल्यामुळे शेतकरी पूर्ण नफा मिळवू शकतील. निर्बंध कमी झाल्याने परकीय गुंतवणूक तसेच खाजगी गुंतवणूकदारांचा ओघ वाढेल. किंमत स्थिर राहण्यास मदत होईल. ग्राहक आणि शेतकरी दोघांचा फायदा होईल.
अनेक दशकांपासून आपले शेतकरी बांधव, अनेक प्रकारच्या बंधनांत अडकले होते आणि त्यांना दलालांचा समना करावा लागत होता. आता ही विधेयके संसदेत मंजूर झाल्याने, या सर्वांतून शेतकऱ्यांची मुक्ती झाली आहे. यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रयत्नांना बळकटी येईल आणि त्यांची समृद्धी निश्चित होईल,” असेही खासदार रक्षाताई खडसे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे सर, पंस सभापती मनीषाताई पाटील, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, तालुका सरचिटणीस प्रशांत पाटील, माजी पंस सभापती प्रीतीताई पाटील व शेतकरी बंधू उपस्थित होते.