कोरोनाच्या मृतदेहांचे व्यवस्थापन आणि अंतिम प्रक्रिया कशाप्रकारे केली जाते? – हायकोर्ट
काही दिवसांपूर्वी मुंबईतील सायन हॉस्पिटलमधील कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहा शेजारीच इतर रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव व्हिडिओमधून समोर आले होते. हा व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता. यानंतर यांसदर्भात भाजपचे नेते आशिष शेलार यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी केली. मुंबई हायकोर्टाने मुंबईसह राज्यातील हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांचे व्यवस्थापन आणि अंतिम प्रक्रिया कशाप्रकारे केली जाते? याची माहिती १ जुलैपर्यंत सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहे.
सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टने सायन हॉस्पिटलसारखी घटना पुन्हा घडू नये याची दक्षत घ्या, असेही राज्य सरकारला बजावले आहे. शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एम.एस.कर्णिक यांच्या खंडपीठापुठे सुनावणी झाली. आशिष शेलार यांनी दाखल केलेल्या याचिकेतून सायन हॉस्पिटलमधील भयावह प्रकार पुन्हा होऊ नये आणि याबाबत चौकशी करावी, अशी मागणी केली गेली आहे. या घटनेबाबत हायकोर्टने देखील चिंता व्यक्त केली.
तसेच याबाबत चौकशी सुरू केली असली तरी अद्याप त्याचा कोणताही अहवाल आलेला नाही अशी माहिती पालिकेने आपली बाजू मांडताना हायकोर्टाला दिली आहे. या याचिकेवर ३ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.