कोरोना बाधित रुग्णांसाठी आता ऑनलाईन बेड बुकिंग !
ठाणे: कोरोना बाधित रूग्णांचा वाढत आलेख बघता बाधित रुग्णांना रूग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ आणि सोयिस्कर व्हावी आणि प्रत्येक गरजू रूग्णांस बेड उपलब्ध व्हावा अशा सूचना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी हा निर्णय घेतला.यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने Online बेड अलोकेशन सिस्टम तयार करण्यात आली असून त्यासाठी www.covidbedthane.in या संकेतस्थळावरून वेबलिंक कार्यान्वित करण्यात आली आहे. दरम्यान कोवीड 19 बाबत नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्याकरिता कॅाल सेंटरही कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॅा.विपिन शर्मा यांनी दिली आहे.
वेबलिंक कार्य प्रणाली-
महापालिके द्वारे बनविलेल्या www.covidbedthane.in या संकेतस्थळावरून वेबलिंक उघडल्यानंतर दिलेल्या फॅार्मवर भरून सादर केल्यानंतर ती माहिती महापालिका मुख्यालयामधील मध्यवर्ती बेड आयलोकेशन पथकाला प्राप्त होईल. रूग्णाने दिलेल्या माहितीच्या आधारे त्या रूग्णांस क्लिनिकल स्टेटसनुसार कोवीड केअर सेंटर, डेडिकेटेड कोवीड हेस्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोवीड हॅास्पीटलमध्ये दाखल करण्याची आवश्यकता आहे त्याचा निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर रूग्णाने रूग्णावाहिकेची मागणी केल्यास त्याची माहिती ॲम्ब्युलन्स टीमकडे जाईल. त्यानंतर सबंधित रूग्णांस सेंट्रल बेड अलोकेशन टीम आणि रूग्णवाहिकेची माहिती असणारा संदेश पाठविण्यात येईल. रूग्णांच्या मागणीनुसार त्यास कोवीड केअर सेंटर, डेडिकेटेड कोवीड हेस्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोवीड हॅास्पीटल यापैकी कोठे दाखल करावयाचे आहे त्यानुसार दाखल करण्यासाठी रूग्णावाहिका उपलब्ध करून देण्यात येईल सदरील रूग्ण रूग्णवाहिकेमध्ये बसल्यानंतर त्याच्या मोबाईलवर ओटीपी पाठविण्यात येईल क्रमांक विचारण्यात येईल तो ओटीपी क्रमांक दिल्यानंतर रूग्णांस संबंधित रूग्णलयामध्ये दाखल करण्यासाठी नेण्यात येईल आणि तसा अहवाल कोविगार्ड डॅशबोर्डच्या माध्यमातून संबंधित रूग्णालयासही कळविण्यात येईल. याबाबतची कार्यपद्धती या वेबलिंकवर देण्यात आली आहे.