कोर्टाचे सर्व निकाल भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावेत – सरन्यायाधीश न्या. चंद्रचूड
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। केंद्र सरकार शिक्षणामध्ये स्थानिक भाषांना प्राधान्य दिलं जावं यासाठी प्रयत्न करत असताना सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी कोर्टाचे सर्व निकाल भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावेत यासाठी आवाहन केलं असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निकाल सर्व भारतीय भाषांत उपलब्ध होतील या दिशेने काम केलं जावं असं आवाहन सरन्यायाधीशांनी रविवारी केलं. न्या. चंद्रचूड यांच्या या सूचनेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं असून याचा देशातील अनेकांना खास करून तरुणांना फायदा होईल असं म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीशांच्या भाषणाचा व्हिडीओ ट्वीट केला असून त्यांच्या सूचनेचं कौतुक केलं आहे. “सरन्यायाधीशांची सूचना कौतुकास्पदच आहे. भारतीय भाषांत निकालपत्रे उपलब्ध झाल्यास त्याचा अनेकांना, खास करून ग्रामीण भागातील तरुणांना निश्चीत फायदा होईल,” असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीशांनी न्यायव्यवस्थेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाचे निकाल भारतीय भाषांत उपलब्ध व्हायला हवेत. जेणेकरून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. अन्यथा ९९ टक्के लोकांपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे काम पोहचणार नाही”.
“न्यायालयातील सुनावणी प्रत्येकाला समजली पाहिजे, ही जबाबदारी बार कौन्सिलची आहे. न्यायालय आणि वकील काय काम करतात ते ९९ टक्के लोकांपर्यंत पोहोचतच नाही. यानंतरचा आपला पुढचा टप्पा सर्वोच्च न्यायालयाची सर्व निकालपत्रे सगळ्या भारतीय भाषांत उपलब्ध करून देण्याचा असायला हवा. तंत्रज्ञानाच्या मदतीने हे साध्य करता येईल,” असंही त्यांनी सांगितलं.