ग्रामविकास अधिकार्यांची ग्रामस्थांना नोटीस; किनगांव बु. व खुर्द दिनांक 21 जुलै पर्यंत बंद राहणार !
यावल (प्रतिनिधी) । दिनांक 14 जुलै मंगळवार पासून दिनांक 21 जुलै मंगळवार 2020 असे एकूण 7 दिवस किनगांव बुद्रुक आणि किनगाव खुर्द गावातील व्यवहार बंद ठेवणे बाबतची नोटीस यावल तालुक्यातील किनगांव बुद्रुक ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांनी आज दिनांक 13 रोजी काढली यामुळे किनगांव ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
यावल तालुक्यातील किनगांव बुद्रुक ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांनी दिलेल्या नोटीस मध्ये नमूद केले आहे की नागरिकांना कळविण्यात येते की कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिनांक 14 जुलै ते दिनांक 21जुलै 2020 पर्यंत पूर्ण किनगांव बुद्रुक व किनगाव खुर्द गांव हे लॉकडाऊन करण्यात येत आहे. त्या दरम्यान मेडिकल दुकान सकाळी 8 ते 12 व दुपारी 4 ते 7 या वेळेत सुरू राहतील. कृषी केंद्र सकाळी 8 ते 12 पर्यंत सुरू राहतील, तसेच दूध डेअरी सकाळी 6 ते 10 व दुपारी 4 ते 6 सुरू राहतील, एलपीजी गॅस विक्री दुकाने सुरू राहतील. तसेच किराणा दुकान, चिकन, मटण, मासे विक्री, गॅरेज, कापड दुकान, मोबाइल दुकान, हार्डवेअर दुकाने, पुस्तकालय, खानावळ, हॉटेल, चहा दुकाने, परमीटरूम बियरबार, कोल्ड्रिंक्स, देशी दारू विक्री व भाजीपाला पूर्णता बंद राहतील.
कलम 188 प्रमाणे सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास रक्कम रुपये 2100 तात्काळ दंड केला जाईल. लग्न व इतर सार्वजनिक कामासाठी फक्त 20 व्यक्तींची यावल तहसीलदार यांच्याकडून परवानगी घेणे बंधनकारक राहील. मास्क न लावता आढळल्यास रक्कम रुपये 200 मात्र दंड वसूल केला जाईल. दंड न भरल्यास संबंधितांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल केला जाईल. याची किनगांव बुद्रुक आणि किनगांव खुर्द ग्रामस्थांनी नोंद घ्यावी असे दिलेल्या नोटीसमध्ये ग्राम विकास अधिकारी यांनी म्हटले आहे.
किनगांव मध्ये गेल्या 8 दिवसापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यावेळेस किनगांव मधील काही ठराविक एक-दोन लोकप्रतिनिधीच्या राजकीय दबाव आणि प्रभावाला बळी न पडता आरोग्य विभाग, महसूल विभाग, आणि पोलीस कर्मचारी यांनी कोरोनाविषाणू ला प्रतिबंध करण्यासाठी ठोस निर्णय घेतले असते तर किंनगांवात कोरोनाविषाणूला मोठा प्रतिबंध झाला असता असे संपूर्ण किनगाव परिसरात बोलले जात आहे. किनगाव मधील काही लोकप्रतिनिधींनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शासकीय कामकाजात हस्तक्षेप करायला नको असे सुद्धा ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे.