चांगली बातमी! कोरोनाच्या उपचारात मदत होणार ‘या’ घटकाचा शोध.
नवी दिल्ली: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे जवळपास २०० देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. जगभरातील एक कोटीहून अधिक नागरिकांना करोनाची बाधा झाली असून पाच लाख जणांना प्राण गमवावे लागले आहे. तर, दुसरीकडे करोनाबाधितांच्या उपचाराच्या दृष्टीने महत्त्वाचे संशोधन समोर आले आहे. जवळपास सहा महिन्यांपासून करोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवला आहे. काही देशांनी करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवले असले तरी पुन्हा करोनाबाधित आढळत असल्याचे चिंता व्यक्त केली जात आहे. करोनाला अटकाव करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. करोनाबाधितांच्या उपचारासाठी फायदेशीर ठरणारे संशोधन समोर आले आहे.
दक्षिण फ्लोरिडा विद्यापीठाच्या ‘सेल रिसर्च’च्या पाहणीत म्हटल्या नुसार कोव्हिड-१९’च्या विषाणूंची फेरनिर्मिती रोखणाऱ्या घटकांचा शोध लावण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. विशिष्ट औषधांच्या वापराने मानवी शरीरातील घटक कोव्हिड-१९च्या विषाणूंना पुन्हा तयार होण्यास रोखत असल्याचे आढळले आहे, हिपेटायटीस सी वरील औषध बोसप्रेव्हिर आणि सध्या विशिष्ट आजारासाठी वापरले जाणारे औषध जीसी-३७६- ही दोन्ही औषधे सार्स-कोव्ह-२च्या मेन प्रोटीज (एमप्रो) एंझिमला लक्ष्य करतात असे या पाहणीत आढळले आहे. विषाणू जेव्हा शरीरात प्रवेश करतात, त्या वेळी एंजिम प्रोटिन्सला त्यापासून दूर करतात. जर एमप्रो नसेल तर विषाणू पुन्हा निर्माण होत नसल्याचे यात दिसून आले.
सध्या कोव्हिडसारखे जे आजार निर्माण होत आहेत त्यावर नवे औषध निर्माण करण्याचा आपल्याकडे वेळ नाही, असे विद्यापीठातील सह प्राध्यापक यू चेन यांनी म्हटले आहे. कोव्हिडवर अनेक कंपन्या औषधे तयार करीत आहेत. मात्र, आमच्याकडे जी नवी माहिती आणि तंत्रज्ञान आहे त्यावरून आम्ही अधिक चांगले औषध वेगाने तयार करू शकतो, असेही चेन म्हणाले.
दरम्यान, जगभरातील अनेक देशांमध्ये करोना संसर्गाचा कहर सुरू आहे. काही मोजक्या देशांना करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यास यश आले असले तरी अनेक देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. करोनाचा जोर ओसरणे तर दूर अद्याप संसर्गाने उच्चांक गाठला नसल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. जगभरातील देशांनी निर्देशांचे योग्य पालन न केल्यास करोनाचे संकट अधिकच गडद होणार असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.