भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे केंद्रीय पथकाचे निर्देश

 जळगाव (प्रतिनिधी) दि. 20 – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह सर्वच यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे समाधान व्यक्त करतानाच मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रामधील निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली जावी. असे स्पष्ट निर्देश केंद्रीय पथकाचे प्रमुख ओएचएफडब्ल्युचे वरिष्ठ विभागीय संचालक डॉ. ए. जी. अलोने यांनी दिले. कोरोना प्रतिबंधासाठी स्थानिक लोक प्रतिनिधीं तसेच स्वयंसेवक यांचे सहकार्य  घेण्याचेही त्यांनी सांगितले. जळगाव शहर व जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांच्या समवेत  आढावा बैठक पार पडली. यावेळी अलोने बोलत होते.

            बैठकीस  खासदार रक्षाताई खडसे, डॉ.एस.डी. खारपाडे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त सतिश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय  महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पाटोडे, अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उप विभागीय अधिकारी  दिपमाला चौरे, सीमा आहिरे, रामसिंग सुलाने, अजित थोरबोले, तुकाराम हुलवळे, इंडियन मेडीकल असोशियनचे पदाधिकारी डॉ.दिपक पाटील, स्नेहल फेगडे, डॉ.अजित पाटील, डॉ. राधेशाम चौधरी आदि उपस्थित होते.

केंद्रीय पथकाचे प्रमुख डॉ. अलोने पुढे म्हणाले की, जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजना समाधानकारक आहेत, झोपडपट्टीचा भाग तसेच जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. जेष्ठ नागरिक तसेच इतर आजार असलेल्या व्यक्तींची तातडीने तपासणी होणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाब तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य आहे का तसेच त्यांचा औषधोपचार व्यवस्थित सुरू आहे, याबाबतही कायम आढावा घेण्यात यावा, याकामी त्याच परिसरातील वॉर्डनिहाय स्वयंसेवकांची  नेमणूक करावी, जेणेकरून या कामात गती  येईल व स्वयंसेवक त्याच भागातील असल्याने तातडीने उपाययोजना करणे सुलभ होईल असे सांगतानाच पल्स ऑक्सीमीटरचा वापर करण्यात यावा, संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याबरोबरच अधिक चाचण्या करण्यावर भर देण्यात येवून चाचण्यांचे निदान (स्वॅबचे रिपोर्ट) २४ तासात प्राप्त होतील अशा उपाययोजना कराव्यात. कोविड आणि नॉन कोविड रुग्णालयांमध्ये रुग्ण तपासणी करण्यात यावी.  कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांना देखील उपचार मिळावेत यासाठी आवश्यक ते नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

जळगाव शहरात कोणत्या हॉस्पीटलमध्ये बेड उपलब्ध आहेत, याचे डॅशबोर्ड तयार करून ठेवावे, या डॅशबोर्डच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांना बेड उपलब्धतेची माहिती मिळणार आहे. बेड व्यवस्थापन यंत्रणा तसेच रुग्णवाहिका व्यवस्थापन यंत्रणा अत्यंत गतिमान करा असे सांगून जळगाव जिल्हयातील एकूण रुग्णसंख्या, परिसरनिहाय रुग्ण, रुग्णांमध्ये असलेले विविध आजार, रुग्णांचे वर्गीकरण, कोरोनामुळे मृत्यू झालेले रुग्ण त्याची कारणे, प्रतिबंधित क्षेत्राचा तपशील, घरोघरी झालेले सर्व्हेक्षण, कोवीड सेंटर, शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांची स्थिती आदींचा आढावा यावेळी पथकाने  घेतला.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत, शासकीय वैद्यकीय  महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.रामानंद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांनी जळगाव जिल्ह्यातील आतापर्यंत तपासणी करण्यात आलेले नागरिक, यापैकी बाधित रुग्ण, मृत्यू झालेल्या नागरिकांची वैद्यकीय पार्श्वभूमी, बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या, प्रतिबंधित क्षेत्र आणि त्यातील उपाययोजना, तसेच शासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची  सविस्तर माहिती सादर केली.

आढावा बैठकीनंतर केंद्रीय पथक आणि जिल्हाधिकारी यांचेसह कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या कोविड रूग्णालयाची तसेच प्रतिबंधित क्षेत्रांची पाहणी करून माहिती घेतली. तसेच यंत्रणेला  पथकाकडून आवश्यक त्या सुचना व खबरदारीचे निर्देश दिले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!