जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधी 31 जानेवारीपर्यंत वाढविला
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव, (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूचा (COVID19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, निर्देश, नियमावलीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश लागू राहतील, असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कळविले आहे.
जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या 14 मार्च, 2020 रोजीच्या आदेशान्वये कोरोना विषाणूचा (COVID 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 13 मार्च 2020 पासून लागू आहे. त्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूवर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत. जिल्ह्यात 22 डिसेंबर 2020 च्या आदेशान्वये जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात 5 जानेवारी 2021 पर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपावेतो, तर जळगाव महानगरपालिका, सर्व नगरपालिका, सर्व नगरपरिषद क्षेत्रात 31 डिसेंबर 2020 रोजी रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णत: संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. त्यानंतर राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढविला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्याकरीता लॉकडाऊनचा कालावधी 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे.
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावलीनुसार या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश लागू राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस संबंधित पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.