जिल्ह्यातील जळगावसह तीन मोठ्या शहरात लॉकडाउनचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश !
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात सातत्याने वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिका, भुसावळ आणि अमळनेर नगरपालिका क्षेत्र या ठिकाणी दि. ७ जुलै च्या पहाटे ५ वाजेपासून ते १३ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेश काढले आहेत. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा (केवळ औषधी दुकाने व दुध विक्री) सुरू राहणार आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात दिसून येत आहे त्यात जळगाव,भुसावळ व अमळनेरात कोरोना बाधित रुग्णांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नागरीकांची बाजारपेठेत सातत्याने गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव देखील वाढत आहे यामुळे लोकप्रतिनिधीं व सामाजिक संघटनांकडून गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनची मागणी होत होती. त्यामुळे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 7 जुलै रोजी पहाटे पाच वाजेपासून लॉकडाऊन सुरू होणार असून ते 13 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत ते चालणार आहे.
या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेत येणारी औषध दुकाने तसेच दुध डेअरी सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे शिवाय नागरीकांना त्यांच्या रहिवास असलेल्या भागातूनच व्यवहार करता येतील शिवाय त्यासाठी दुचाकी, तीनचाकी तसेच चारचाकीचा वापर करता येणार नाही. कृउबामध्ये घाऊक खरेदीचे व्यवहार नियमांचे पालन करून सुरू राहतील तसेच शेतीविषयक कामे करण्यासाठी तसेच बी, बियाणे, खते घेण्यासाठी परवानगी असेल मात्र त्यासाठी सातबारा उतारा आवश्यक असणार आहे. या काळात सर्व सेवा, सर्व आस्थापने, सर्व दुकाने व सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कार्यालये मात्र सुरू राहतील तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच इंधन विक्री करता येईल शिवाय लग्न समारंभासाठी 50 लोकांना परवानगी असेल मात्र त्याची माहिती आधी स्थानिक प्रशासन तसेच पोलिसांना द्यावी लागणार आहे तसेच अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवानगी असणार आहे. हा आदेश केवळ जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्र, भुसावळ व अमळनेर नगरपालिका क्षेत्रासाठी लागू असणार आहे. आदेशाची अंमलबजावणी न करणार्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी आदेशात नमूद केले आहे.