दंडात्मक कारवाई निंभोऱ्यात, पावती पुस्तक मात्र निंबोल ग्रामपंचायतचे; निंभोरा पोलिसांची कारवाई
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी.ता.रावेर (भीमराव कोचुरे)। कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून रस्त्यावर भटकंणाऱ्याकडून दंड वसुलीसाठी रावेर तालुक्यातील निंभोरा येथील पोलिसांनी निंबोल ग्रामपंचायतीचे नमुना नंबर 7 सामान्य पावती पुस्तक घेऊन स्वतः चिटणीसाचे स्वाक्षरीने निंभोरा परिसरातील नागरिकांवर काल दि.15 रोजी दंडात्मक कारवाई केल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून निंबोल ग्रामपंचायतीचे पावती पुस्तक निंभोरा पोलिसांकडे कसे, कोणाच्या आदेशान्वये, आणि निंबोल ग्रामपंचायतीची दंडात्मक वसुली निंभोरा गावात कशी करण्यात येत आहे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून निंबोल ग्रामपंचायत चिटणीसच्या खांद्यावर बंदूक ठेवून परिसरातील नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम व तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील निंबोल ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एम.डी.पाटील यांच्याशी आज सकाळी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता निंभोरा पोलिसांकडे निंबोल ग्रामपंचायतीचे नमुना नंबर 7 चे पावती पुस्तक दिले आहे किंवा नाही याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की निंबोल येथे मी चार पाच दिवसापूर्वी पदभार घेतला आहे तत्कालीन ग्रामसेवक यांनी पावती पुस्तक दिले असेल?त्याबाबत मला काहीच माहिती नाही असे सांगितले. तसेच निंबोल ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक गणेश पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की निंबोल ग्रामपंचायतीचे नमुना नंबर 7 पावती पुस्तक हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये निंभोरा पोलिसांना दिले असल्याचा त्यांनी दुजोरा दिला.रावेर पंचायत समिती गटविकास अधिकारी किंवा रावेर तहसीलदार यांनी लेखी आदेश दिले असल्यास त्याची छायांकित प्रत माहितीसाठी मिळावी , असे म्हटले असता, आदेश शोधावा लागेल असे उत्तर दिले गेले .ग्रामपंचायतीचे नमुना नंबर 7 चे पावती पुस्तक ग्रामपंचायत चिटणीस या नावाने पोलिसांना दंडात्मक कारवाई करताना पावती देता येते का?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे,आणि यामुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की,निंभोरा येथे गुरुवार दि. 15रोजी गावात एकाच ठिकाणी गर्दी करत भाजी पाला विक्रेत्यांनी भाजीपाल्याचे दुकाने लावल्यामुळे भाजी पाला घेणाऱ्यांची गर्दी झाली होती यावर निंभोरा पोलीस स्टेशन तर्फे कारवाई करण्यात आली.भाजीपाला विक्रेत्यांचे वजन माप काटे जमा करण्यात येऊन कारवाई करण्यात आली.भाजीपाला जिवनावश्यक वस्तू कायद्यात येत असला तरी कोरोना महामारी आपत्ती कायदयानुसार गर्दी,जमाव जमा केल्याबद्दल सोशल डिस्टन्स न पाळल्याबद्दल कारवाई करण्यात आली. निंभोरा पोलिसांनी भाजीपाला विक्रेत्यावर निंभोरा बु.ग्रामपंचायत परिसरात कारवाई करण्यात आली परंतु त्यांना दंड पावती म्हणून रुपये 500 भरण्यात सांगितले भाजीपाला विक्रेते आपले वजन काटे घेण्यास गेले तेव्हा चक्क दंड पावती ही निंबोल ग्रामपंचायत नमुना7ची सामान्य पावती त्यांना देण्यात आली.” दंडात्मक कारवाई निंभोरा गावात पावती मात्र निंबोल ग्रामपंचायतीची ” असे निदर्शनात आले. तसेच निंभोरा पोलिसांनी दंडात्मक कारवाई करताना प्रत्यक्ष दंड वसूल करीत असताना त्याच्याच नावाने किंवा स्वाक्षरीने दंडाची पावती नागरिकांना द्यावी .