दीपोत्सवात वाटीभर फराळ द्या अन वंचितांचे तोंड गोड करा, भुसावळातील अंतर्नाद प्रतिष्ठानच्या उपक्रम
भुसावळ (प्रतिनिधी)। भुसावळ येथील अंतर्नाद प्रतिष्ठानने वाड्या वस्त्यात दीपोत्सवात फराळ, नवीन कपडे आणि शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.दात्यांकडून वाटी वाटी फराळ, सुस्थितीतील जुने कपडे, नविन कपडे आणि शालेय साहित्य गोळा करायचे. गरजू वस्त्या शोधायच्या आणि त्याठिकाणी दिवाळी साजरी करायची असा हा उपक्रम आहे.यंदा उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे.
समाजाचे आपण काही देण लागतो या भावनेतून अंतर्नाद प्रतिष्ठानने सन २०१६ मध्ये या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली.पहिल्या वर्षी चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी, दुसऱ्या वर्षी जोगलखोरी व रावेर तालुक्यातील जुनी मोहमांडली येथे, तिसऱ्या वर्षी सातपुड्यातील काळाडोह, मोर धरण, विटवा या वस्तीवर तर चवथ्या वर्षी वड्री धरणाजवळील आसराबारी या आदिवासी वस्तीवर हा उपक्रम राबविण्यात आला.यंदा सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जामुन झिरा या आदिवासी पाड्यावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
शहरवासीयान कडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता यंदा व्यापक स्वरूप देण्याचा मानस प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकानी व्यक्त केला आहे.ज्यांना शक्य नसेल पण देण्याच सुख अनुभवायच असेल त्यांनी जुने कपडे स्वच्छ धुवुन व इस्त्री करुन द्यावे.फराळ द्यायचा असेल तर उपक्रम समितीशी संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प प्रमुख योगेश इंगळे,समन्वयक जिवन सपकाळे, सह समन्वयक हरीश भट यांनी केले आहे.
उपक्रमासाठी ज्ञानेश्वर घुले, संजय भटकर ,प्रदीप सोनवणे, अमितकुमार पाटील, जीवन महाजन, समाधान जाधव, सुनील वानखेडे, शैलेंद्र महाजन, श्याम दुसाने, निवृत्ती पाटील,संदीप रायभोळे, देव सरकटे, भूषण झोपे, अमित चौधरी, प्रमोद पाटील, सचिन पाटील, राजू वारके, विक्रांत चौधरी, तेजेंद्र महाजन, कुंदन वायकोळे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील परिश्रम घेत आहेत.
जुने नवे कपडे गोळा करणार–
गेल्या वर्षी या उपक्रमात फराळासह जुने व नवे कपडे गोळा करण्यात आले होतेते जवळपास ४०० व्यक्तीना वाटप करण्यात आले होते.यंदा उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे.ज्यांच्याकडे जुने पण चांगल्या स्थितीतील शालेय दप्तर, स्वेटर , ब्लॅकेट असतील ते देण्यासाठी प्रतिष्ठानच्या उपक्रम समितीकडे द्यावे असे आवाहन प्रकल्प प्रमुख योगेश इंगळे यांनी केले आहे.