देशात कोरोनाचे थैमान, २४ तासात रुग्ण संख्येत विक्रमी वाढ !
नवी दिल्ली: देशात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. देशात मागील २४ तासांत सर्वाधिक २७ हजार ११४ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली असून ५१९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ लाख २० हजार ९१६वर पोहोचला असून मृतांचा आकडा २२ हजार १२३ झाला आहे. तसेच आतापर्यंत ५ लाख १५ हजार ३८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या २ लाख ८३ हजार ४०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
आज आलेल्या आकडेवारीनुसार दर तासांला एक हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळून येत आहेत. आज देशात नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्याने मागील विक्रम पुन्हा एकदा मोडला आहे. मागील चार दिवसांत एक लाख नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे.
१० जुलै पर्यंत देशात १ कोटी १३ लाख ७ हजार २ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल २ लाख ८२ हजार ५११ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदने (ICMR) दिली आहे.