भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

पिक विमा निकषांबाबत शेतकऱ्यांनी केला निषेध व्यक्त; 2 हजार पोस्टकार्ड कृषी व पालकमंत्र्यांकडे रवाना, यावल तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरणार……..?

यावल (प्रतिनिधी)। केळी व इतर पीक विमा संदर्भात योजनेचे निकष बदलविण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली परंतु 15 जुलै 2020 पर्यंत अहवाल न आल्याने महाराष्ट्र सरकारने सन 2020 ला बदलून दिलेले निकषच लागू करावे लागणार आहे, हे निकष शेतकऱ्यांना मारक ठरणार असल्याने यावल तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषिमंत्री व राज्य शासनाचा तीव्र निषेध व्यक्त करीत आज दिनांक 31 जुलै 2020 शुक्रवार रोजी यावल पोस्टात 2 हजार पोस्टकार्ड टाकून कृषी व पालक मंत्र्याकडे रवाना करून पिक विमा निकष न बदलल्यास वेळेप्रसंगी तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा यावल शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात कृषिमंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी यावल येथील शेतकरी आणि भारतीय जनता पार्टी चे कट्टर समर्थक स्वीकृत नगरसेवक तथा स्री रोग तज्ञ डॉ. कुंदन फेगडे यांच्या नेतृत्वाखाली यावल शहरातील व तालुक्यातील शेतकऱ्यांनी अंदाजे 2 हजार पोस्टकार्ड आपल्या नावानिशी लिहून
यावल पोस्टात टाकून महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे रवाना केले. या संदर्भात दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रा मध्ये पीक विमा योजनेचे निकष बदलण्यासाठी कृषि आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीचा अहवाल 15 जुलै 2020 रोजी येणे अपेक्षित होते, परंतु सदर अहवाल आज पावेतो
प्राप्त न झाल्याने महाराष्ट्र सरकार ने या वर्षी 2020 ला बदलून दिलेले निकषच लागू करावे लागतील आणि सदर निकष शेतकऱ्यांसाठी मारक आहेत आणि हे निकष पुढील 3 वर्ष बदलणार नाहीत.

जळगाव जिल्यात केळी पिकाखाली 48 हजार हेक्टर जमीन असून एवढ्या सर्व शेतकऱ्यांना या निकषामुळे नुकसान भरपाई मिळणे मुश्किल होईल किंवा मिळणारच नाही, हा निर्णय केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे. आणि सदर निर्णय आणि निकष बदलणे अत्यंत गरजेचे आहे.
एक तर अगोदरच मागील वर्षी अतिवृष्टी मुळे , या वर्षी लॉकडाउन मुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत, त्यात पुढील वर्षी हवामान बदलाच्या संकटामुळे नुकसान झाले तर नुकसान भरपाई सुद्धा मिळणार नाही. आणि शेतकऱ्याचे कंबरडे मोडेल आणि या प्रकाराला महाराष्ट्र शासन आणि त्यांचे धोरण जबाबदार असेल.
सद्य परिस्थिती मध्ये जमावबंदी असल्याने शेतकरी अजून शांत आहे. शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत बघू नका असे नमूद करीत कृषिमंत्री आणि जळगाव चे पालकमंत्री यांना पत्र लिहून आम्ही सर्व यावल तालुक्यातील शेतकरी निषेध नोंदवत आहे. जर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली नाही तर
शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि उद्भवणाऱ्या परिस्थितीला शासन जबाबदार राहील. शेतकऱ्यांवर अन्याय करून विमा कंपनीचे पोट भरण्याचे कुभांड शासन रचत आहे. हे सदर निर्णयातुन स्पष्ट होते, तसेच स्वतःच्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष पीकाचे निकष न बदलता जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम कृषीमंत्री यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या घरी पत्र पाठवून निषेध नोंदविण्याचा निर्णय आम्ही शेतकऱ्यांनी घेतला आहे. आणि त्या अंतर्गत 2 हजार पोस्ट कार्ड / पत्र कृषी मंत्री आणि पालकमंत्री यांना प्रतिनिधीक स्वरूपात लिहून पाठवित आहोत. यासाठी 2 हजार पोस्टकार्ड कृषिमंत्री आणि पालकमंत्री यांचा पत्ता टाकून आम्ही शेतकऱ्यांना दिलेत त्यांचे मत त्यावर लिहून मागवले आणि सर्व पत्र आम्ही पोस्ट ऑफिस मध्ये पाठविण्यासाठी आज दिनांक 31 जुलै 2020 शुक्रवार रोजी पोस्टात दिले .बऱ्याच शेतकऱ्यांनी आपापल्या गांवातल्या टपाल पेटीत ते पोस्ट कार्ड टाकलेत.

यासाठी डॉ. कुंदन फेगडे, राकेश फेगडे, डॉ.निलेश गडे, प्रमोद शेठ नेमाडे , सुनिल पाटील, कोमल चौधरी, संदीप भारंबे , डॉ.पराग पाटील, गोपालसिंग राजपूत, भुषण फेगडे, स्नेहल फिरके, रितेश बारी, उज्वल कानडे, निर्मल चोपडे, सागर चौधरी, कोमल इंगळे, संजय फेगडे, इत्यादी शेतकरी तथा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच तालुक्यातील ईतर शेतकऱ्यांनी सुद्धा पत्र लिहून निषेध नोंदवावा असे आवाहन करण्यात आले असून पुढील काळात आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल हे सुद्धा लक्षात घावें “बळीराजा ला न्याय मिळालाच पाहिजे” आणि या बळीराजा ला न्याय मिळत नसेल तर त्याला स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावेच लागेल “अन्याया विरुद्ध लढण्यासाठी माझ्या बळीराजाला घेऊन मी रस्त्यावर उतरेल ” असे डॉ. कुंदन फेगडे यांच्यासह शहरातील व तालुक्यातील शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!