पुण्यातील चिनी कंपनीत घुसला कोरोना, 7 कर्मचारी पॉझिटिव्ह; 130 क्वारंटाइन
पुण्यात कोरोनाच्या सर्वाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यातच चाकन येथील एका कंपनीतील 7 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
पुणे, 19 जून : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना पुण्यात कोरोनाच्या सर्वाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यातच चाकन येथील एका कंपनीतील 7 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात एका चिनी अधिकाऱ्याचाही समावेश आहे. चाकनमधील चिनी कंपनीतील काही कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर, त्यांची चाचणी करण्यात आली. गुरुवारी यातील 7 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.
दरम्यान, आता 130 कर्मचाऱ्यांना यात 9 चिनी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, या सगळ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे, अशी माहिती खेड तालुक्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. हे सर्व कर्मचारी पुण्यातील एका चिनी कंपनीत काम करत होते. चाकनमध्ये ही कंपनी असून कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुख्य म्हणजे चिनी अधिकारी 25 मार्चआधीच चाकनमध्ये पाहणी करण्यास आले होते. मात्र त्यानंतर लॉकडाऊन आणि विमान प्रवास बंद केल्यानंतर ते इथेच अडकले. गेल्या आठवड्यात एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळं संपूर्ण कंपनी सील करण्यात आली असून, 130 कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.