पॅन-आधार जोडणीला पुन्हा मुदतवाढ ; ‘ही’ आहे अंतिम मुदत
यापूर्वी केंद्र सरकारने आर्थिक व्यवहारांची डेडलाईन ३० जूनपर्यंत वाढवली होती. मात्र गेल्या आठवडाभरात देशात करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. लॉकडाउन शिथिल करण्यात आला असला तरी करोनाचा वाढता संसर्ग सरकारसाठी धोक्याची सूचना आहे. त्यामुळे बुधवारी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) नवीन अध्यादेश काढून पॅन आधार जोडणी आणि आयकर विवरण सादर करण्याची मुदत वाढवली.
नवी दिल्ली :
पॅन (परमनंट अकाऊंट नंबर) व आधार क्रमांक जोडणीस केंद्र सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. पॅन-आधार जोडणी आता ३१ मार्च २०२१ पर्यंत करता येईल. त्याशिवाय आयकर विभागाने २०१८-१९ या आर्थिक वर्षातील कर विवरण सादर करण्यास ३१ जुलै २०२० पर्यंत मुदत वाढवली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढवल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या करदात्यांनी २०१८-१९ या वर्षाचे सुधारित कर विवरण पत्र (ITR) सादर केलेला नाही, अशा करदात्यांना ३० जूनपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र मुदतवाढ दिल्याने करदाते २०१८-१९ या वर्षाचे सुधारित कर विवरण पत्र आता ३१ जुलै २०२० पर्यंत सादर करू शकतात. ही डेडलाईन चुकली तर करदात्याला दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. २०१८-१९ या वर्षाचे सुधारित कर विवरण पत्र (ITR) यापूर्वी ३१ मार्च २०२० ही अंतिम मुदत दिली होती. नंतर त्यात ३० जूनपर्यंत वाढ करण्यात आली होती.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) जारी केलेल्या अध्यादेशानुसार आता २०१८-१९ या आर्थिक वर्षातील ITR ३१ जुलै २०२० पर्यंत सादर करता येईल. यामुळे नोकरदारांना आणि करदात्यांना आयकर कलम ८० सी , ८० डी आणि ८० जी नुसार कर वजावटीचे नियोजन करण्यास अतिरिक्त एक महिन्याचा वेळ मिळणार आहे.
केंद्र सरकारने २५ मार्चपासून देशात टाळेबंदी जाहीर केली. नुकताच पाचवा लॉकडाउन ३० जूनपर्यंत वाढवला. त्यापार्श्वभूमीवर सरकारने कर विवरण (ITR) सादर करणे, पीपीएफ, पॅन आधार लिंक या सारख्या आर्थिक कामांची मुदत वाढवली होती. पॅन-आधार जोडणीस आतापर्यंत अनेकवेळा मुदतवाढ मिळाली आहे. यापूर्वी ३० जून २०२० ला मुदत संपणार होती. आधार क्रमांकाशी जोडणी न केलेले पॅन अवैध ठरू शकतील, अशी चुकीची माहिती पसरल्याने या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र त्यात वेळोवेळी मुदतवाढ करण्यात आली. प्राप्तिकर विवरणपत्र सादर करताना आधार क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा