बहिणाबाई कोविड केअर सेंटरला रोटरी क्लब ऑफ सेंट्रलचे डॉ.अपर्णा भट यांची भेट ; उत्तम सुविधांमुळे केले कौतुक !
जळगाव प्रतिनिधी। लेवा पाटीदार सोशल फाऊंडेशन आणि लोकसंघर्ष मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शासकीय तंत्र निकेतनच्या मुलींचे वसतीगृह येथे सुरू झालेल्या बहिणाबाई कोविड केअर सेंटरला आज रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्या अध्यक्षा तथा कलासक्त व्यक्तिमत्त्व डॉ.अपर्णा भट ( कासार ) यांनी भेट देऊन पाहणी केली.
या कोविड केअर सेंटरमध्ये पदाधिकाऱ्यांनी कोणकोणत्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत , तसेच सेंटर चालविताना येणाऱ्या अडी-अडचणी , औषधोपचार, रुग्ण दाखल करतानाची पद्धत , काळजी कशी घेतली जाते याची माहिती जाणून घेतली , नंतर डॉ.अपर्णा भट ( कासार ) यांनी डॉक्टरांशी संवाद साधला आणि समाधान व्यक्त करून जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तसेच बहिणाबाई कोविड केअर सेंटरच्या पदाधिकारी प्रतिभाताई शिंदे आणि केअर सेंटरचे पदाधिकारी , चंदन कोल्हे , सचिन धांडे , चंदन अत्तरदे , अभिजित महाजन ,भरत कर्डिले , तुषार वाघुळदे , राजेश पाटील ,संदीप पाटील , ऍड. पुष्कर नेहते , भूषण बढे ,किरण वाघ ,प्रमोद पाटील ,पराग महाजन आदींचे कौतुक केले. सचिन धांडे व चंदन कोल्हे यांच्याशी डॉ. अपर्णाजी यांनी चर्चा केली आणि कोविड सेंटरचे विविध विभाग , किचन रूम आदींची पाहणी केली.
लेवा पाटीदार सोशल फाऊंडेशन आणि लोकसंघर्ष मोर्चातर्फे केवळ सामाजिक बांधिलकी जपून मोठ्या धाडसाने हे सत्कार्य करीत असल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्या अध्यक्षा आणि विख्यात कलावंत डॉ.अपर्णा भट यांनी हे सेंटर खरोखरच आदर्श सेंटर असल्याचा दाखला दिला व आनंद व्यक्त केला. विनामूल्य हे बहिणाबाई कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. अनेक जण याचा लाभ घेत आहेत.आजमितीस येथे 90 रुग्ण उपचार घेत आहेत. महापालिका आणि जिल्हा प्रशासनाचेही बहुमोल सहकार्य बहिणाबाई कोविड केअर सेंटरला मिळत असल्याचे जनसंपर्क विभागाचे प्रसिद्धी विभागाचे तुषार वाघुळदे यांनी कळविले आहे.