बोदवड ते मलकापूर रस्ता त्वरित दुरुस्ती करावा अन्यथा सरणावर झोपून आंदोलनाचा राष्ट्रवादीचा इशारा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
बोदवड (प्रतिनिधी)। गेल्या कित्येक महिन्यापासून बोदवड ते मलकापूर या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून याची त्वरित दुरूस्ती करावी अन्यथा सरणावर झोपून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस ने दिला आहे.
बोदवड-मलकापूर या रस्त्यावर दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम मंजूर झाले आहे. तरीदेखील संबंधित ठेकेदार व प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर बरेच अपघात झाले आहेत. पोलिस प्रशासन कोरोनाच्या परिस्थितीत काम करत असल्याने वाहनधारकांनी तक्रारी दाखल केलेल्या नाहीत. तहसीलदारांनी स्वत: या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून जनतेला न्याय द्यावा. बोदवड-मलकापूर रस्त्यावर अपघात झाल्यास त्यास प्रशासनाला जबाबदार धरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत आधी निवेदन आपल्याकडे दिलेले असतानाही आपल्या स्तरावरून कोणतीच कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. यामुळे रस्ता त्वरित दुरुस्त करावा अन्यथा ६ जानेवारी रोजी खंडेलवाल पेट्रोल पंपासमोर उपोषणाचा इशारा राष्ट्रवादी कांग्रेसचे कार्यकर्ते प्रमोद धामोडे यांनी तहसीलदार जितेंद्र कुवर याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.