भय इथेच संपत नाही! फूटा-फूटावर २५-२५ चिता जळताहेत; अंत्यविधींना स्मशानं कमी पडताहेत
मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।
मुंबई (विशेष प्रतिनिधी)। स्मशानभूमीतील शवदाहिन्या २४ तास सुरू असतांनाही स्मशानाबाहेर अनेक मृतांचे नातेवाईक वेटिंगवर असल्याचे वास्तव आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रुग्ण वाढीचा वेग चिंता वाढवणारा असून गेल्या १० दिवसांपासून देशात दररोज १ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहे. १० दिवसांपूर्वी देशात पहिल्यांदा २४ तासांत १ लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर देशात ही संख्या वाढतच आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय वेगानं पसरत असल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी आरोग्य व्यवस्था व्हेटिंलेटरवर असल्याचं चित्र आहे. रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत आणि स्मशानात अंत्यसंस्कारासाठी जागा शिल्लक नाही, अशी भीषण दृश्यं सध्या दिसू लागली आहेत.
महाराष्ट्र, दिल्ली पाठोपाठ आता गुजरातमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक स्मशानांबाहेर मृतांच्या नातेवाईकांना अंत्यविधींसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. काही प्रमुख शहरांमधील परिस्थिती गंभीर आहे. हिंदू धर्मात साधारणपणे सूर्योदयानंतर अंत्यविधी करत नाहीत. मात्र कोरोना मृतांचा आकडा वाढतच असल्यानं अनेक ठिकाणी रात्रीदेखील अंत्यस्कार सुरू आहेत. त्यामुळे शवदाहिन्या अक्षरश: २४ तास सुरू आहेत. सूरत शहरातल्या उमरा भागात एका स्मशानात दोन दिवसांपूर्वी एकाचवेळी २५ जणांना अग्नी देण्यात आला. रात्रीच्या सुमारास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बडोद्यातही रात्रीच्या वेळी मृतदेहांवर अंत्यविधी होत आहेत. गुजरातच्या प्रमुख शहरांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि मृतांच्या नातेवाईकांना फार वेळ प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी अधिकाऱ्यांनी लोखंडाच्या चिता तयार केल्या आहेत.स्मशानांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.