भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

भरदिवसा वॉचमनला चाकूचा धाक दाखवून केली रोकडसह दागिन्यांची चोरी !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक (निशाद साळवे) :- इंदिरानगरमधील आदित्य हॉलजवळील तळमजल्यावर राहणार्‍या वॉचमनच्या खोलीत चार चोरटे हातातील चाकूसह घरात घुसून चाकूचा धाक दाखवीत गळ्यातील मंगळसूत्र व इतर दागिने असा 35 हजारांचा ऐवज घेऊन पसार झाले.

या घटनेची अधिक माहिती अशी, की ललिता प्रदीप मरसाळे (वय 28, रा. तळमजल्यावरील वॉचमनची खोली, पाम स्क्वेअर, कैलासनगर, आदित्य हॉलजवळ, इंदिरानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की काल दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जेवण करून त्या मुलासमवेत घरात असताना उघड्या दरवाजातून अचानक चार अनोळखी तरुण घरात घुसले. त्यांनी घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला. यावेळी ते चौघे मला म्हणाले, की तुझ्याजवळचे सोने व पैसे काढून दे. तुझ्याजवळ पैसेे असल्याचे आम्हाला माहीत आहे. तुझा मोबाईलही दे, असेे धमकावू लागले.

यावेळी मरसाळे यांचा मुलगा भावेश हाही उठला. चौघांपैकी पिवळा फुलशर्ट व निळी जीन्स पँट घातलेल्या व्यक्तीच्या हातात धारदार मोठा चाकू होता. तो चाकू त्याने भावेशच्या गळ्याजवळ धरुण त्याला म्हणाला, की तुझे दागिने काढ. नाही तर तुझ्या मुलाला चाकूने मारून टाकतो, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरून गळ्यातील मंगळसूत्र व दोन्ही कानांतील टापसे काढून घेतले. त्यानंतर चौथ्या मुलाच्या हातात कैचीसारखे हत्यार होते. तो घराबाहेर निघून गेला. त्यानंतर माझ्या कानातील बाकीचे कुडके निघत नसल्याने पिवळा शर्ट घातलेल्या मुलाने मला काढते की घालू पोटात? असे धमकावले. खूप प्रयत्न करूनही कानातील बाकीचे दागिने निघत नसल्याने पांढरा शर्ट घातलेल्या मुलाने घरातील सर्व बॅग, पर्स, पलंग व घराची झडती घेण्यास सुरुवात केली. या झडतीत त्याने पर्समधून दहा हजार रुपये काढून घेतले. टेबलवर ठेवलेला मोबाईल उचलून घेतला. त्यानंतर मोठी कैचीसारखे हत्यार असलेला मुलगा पुन्हा घरात आला. बाहेरून कोणी तरी येत आहे, असे म्हटल्याने ती चारही मुले घराबाहेर गेली. त्यांच्याकडे काळ्या रंगाच्या दोन मोटारसायकली होत्या. त्यावर बसून ते मॉलच्या दिशेने पळून गेले.

चोरटे घराबाहेर गेल्यानंतर आम्ही घराबाहेर येऊन आरडाओरड केली असता आमच्या बिल्डिंगमधील जोशी व रितिका हे दोघे इतर तीन-चार लोकांसह जमा झाले. मी त्यांना माझ्याबरोबर घडलेली आपबिती सांगितली. तेव्हा त्यांनी बिल्डिंगच्या बाहेर जाऊन त्या चोरट्यांचा शोध घेतला असता ते सापडले नाहीत. त्यांच्याशेजारी कुलकर्णी यांच्या घराचे लॉक तुटलेले दिसले. त्यानंतर थोड्याच वेळात कुलकर्णी त्यांच्या घरातून आल्या व त्यांनी त्यांच्या घरातून काही दागिने व शिक्के यांची चोरी झाल्याचे सांगितले. या प्रकारात दहा हजार रुपये रोख, साडेसात हजार रुपयांचे मंगळसूत्र, नऊ हजारांचे छोट्या साखळीचे कुडके, सहा हजारांचा मोबाईल असा एकूण 35 हजार 500 रुपयांचा ऐवज भरदिवसा लुटून चोरट्यांनी पोबारा केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 392, 454, 380, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!