महाराष्ट्रात लॉकडाऊनची चर्चा; परराज्यातील कामगारांचे गावी परतण्याचे नियोजन सुरू !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।
पुणे ( प्रतिनिधी) देशातल्या आठ राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. महाराष्ट्रासह छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजरात, पंजाब आणि मध्य प्रदेश या आठ राज्यांत कोविड-19 च्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत असून एकंदर बाधितांपैकी 84 टक्क्यांहून अधिक नवबाधित याच आठ राज्यातले असल्याचं आढळून आलं आहे.
कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे ,देशात एकंदर कोरोनाबाधितांची संख्या आता 1 कोटी 21 लाखांवर गेली असून कोविड-19 मुळे मृतांची संख्या एक लाख 62 हजारांवर गेली आहे. दरम्यान राज्यात काल कोरोनाच्या 39 हजार 544 नवीन रुग्णांची नोंद झाली; तर २२७ जणांचा या आजाराने मृत्यू झाला. राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 3 लाख 56 हजारांहून अधिक झाली आहे. पुणे जिल्ह्यात काल साडे आठ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित आढळून आले.
दरम्यान,राज्यातील कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लावले जाईल अश्या चर्चा सुरु आहेत. सरकारकडून या बाबत अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आले नसले तरीही तसे झाल्यास गेल्यावर्षीसारखी वाईट परिस्थिती ओढावू शकते या भीतीने आता महाराष्ट्रात वास्तव्याला असणाऱ्या परराज्यातील कामगारांनी गावी परतण्यासाठी नियोजन सुरु केले आहे.एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार,देशभरातून अनेक मजूर रोजीरोटीसाठी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्ये वास्तव्य करुन आहेत. यापैकी बहुतांश जण असंघटित क्षेत्र किंवा रोजंदारीवर काम करणारे आहेत. लॉकडाऊन झाल्यास सगळे दैनंदिन व्यवहार ठप्प होतील. त्यामुळे या कामगारांची उपासमार होऊ शकते अशी देखील शक्यायता आहे. कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना गेल्यावर्षी करावा लागला होता यामुळे पूर्वानुभव लक्षात घेवून गावी जाण्याचे नियोजन सुरु झाले आहे.
दरम्यान,कोविड-19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गृह मंत्रालयानं काल मार्गदर्शक सूचना जारी केल्या. या सूचना येत्या 30 एप्रिलपर्यंत लागू असतील. या नव्या मार्गदर्शक सूचनानुसार कोरोना संसर्ग जास्त असणाऱ्या राज्यांना तपासणी, देखरेख आणि उपचार या त्रिसूत्रीची अधिक गांभीर्यानं अंमलबजावणी करावी लागणार आहे. कोरोना संबंधीच्या नियमांचं काटेकोर पालन, प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करण आणि त्याबरोबरच लसीकरणाचा वेग वाढवण्याकडेही राज्यांना अधिक लक्ष द्यावं लागणार आहे.