मुंबईत तयार होतायेत भारतीय सैन्यासाठी नवे सुरक्षाकवच; चिनी सैन्याच्या युद्धनीतीला करणार चितपट
गलवान येथे झालेल्या चकमकीत चिनी सैन्याने खिळे लावलेल्या रॉडचा वापर केला होता. चिनी सैन्य पूर्ण तयारीनिशी आल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई, 18 जून : गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. या चकमकीत चिनी सैन्याने खिळे लावलेल्या रॉडचा वापर केला होता. चिनी सैन्य पूर्ण तयारीनिशी आल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी चिनी सैन्याने क्रूर युद्धनीतीचा वापर करत मध्ययुगीन हत्यारांचा वापर केला, यामुळे भारतीय सैन्याचे अधिक नुकसान झाले.
भारतीय जवानांनीही याला जोरदार प्रत्युत्तर दिले असले तरी आता या रणनीतीला तोंड देण्यासाठी सैन्यदल सज्ज झाले आहे. भारतीय सैन्याच्या नॉर्दन कमांडने कमी वजनाच्या सुरक्षा कवचांनी लढाईसाठी सज्ज असे सैनिकदल उभे करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे एलएसीवर चिनी सैनिकांनी हल्ला केल्यास जीवीतहानी न होऊ देता त्यांना जशास तसे उत्तर देता येईल. नौदलाच्या उत्तर कमांडच्या सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे.
भारतीय सैनिकांच्या या सुरक्षा कवचात आधुनिक यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. हे वजनाने हलके आणि मजबूत आहे. हे घातलेल्या सैनिकाला दगडांच्या माऱ्यांपासून आणि टोकदार वस्तूने वार केल्यास संरक्षण मिळणार आहे. या सगळ्यातून वाचून उत्तरादाखल मारा करणे या सुरक्षा कवचामुळे शक्य होणार आहे. संपूर्ण शरीर संरक्षक कवचाच्या पहिल्या 500 सेटची डिलिव्हरी सप्लायरकडून मुंबईतून लेहला करण्यात आली आहे. तिथे ही अंगकवचे एलएसीवर तैनात सैनिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
याचबरोबर काटेदार दंड भारतीय सैनिकांना देण्याबाबतही विचार सुरु असल्याचीही माहिती आहे. गेल्या महिन्यात पेंगॉन तलावाच्या किनाऱ्यावर झालेल्या चकमकीत चिनी सैनिकांनी काटेरी तारांनी वेढलेल्या दंडांचा उपयोग मारहाणीसाठी केला होता. यात काही भारतीय सैनिक जखमीही झाले होते. 1993 साली झालेल्या भारत-चीन सैनिकी कराराशी दोन्ही देश बांधलेले आहेत. या करारानुसार बंदुकांचा वापर करण्यास मनाई आहे. नियम असा आहे की, रायफल सैनिकांच्या पाठीवर असते आणि बॅरेल म्हणजे रायफलचे तोंड हे जमिनीच्या दिशेने असते. दोन्ही बाजूकडून सैन्यांत आत्तापर्यंत झालेल्या चकमकीत धक्काबुक्की आणि मारहाण झाली आहे, मात्र कधीही बदुंकींचा वापर झालेला नाही. आधुनिक युद्धात मध्ययुगीन हत्यारांचा वापर ही काही नवी घटना नाही, पहिल्या महायुद्धातही धातूच्या चाकूंचा आणि काटेरी दंडांचा वापर करण्यात आला होता. शत्रूंच्या सैनिकांच्या शरीराला अधिकाधिक हानी कशी पोहोचू शकेल, याचा विचार करुन ही शस्त्रे तयार करण्यात येतात. आज तकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.
गलवान खोऱ्यात चीनच्या सैन्याने नियमांचे उल्लंघन करुन मध्ययुगीन शस्त्रांचा वापर केला आणि भारतीय सैन्यदलातील 20 जवान धारातीर्थि पडले, तर भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युतरात त्यांचे 35 हून अधिक सैनिक मारले गेले आहेत. या घटनेनंतर चिनी सैन्याचा मुकाबला कार्यक्षमरित्या करण्यासाठी भारतीय सैन्याने नवे सुरक्षाकवच धारण केले आहे.