या बड्या नेत्याला उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवले !
नवी दिल्ली: राजस्थान काँग्रेसने बंडखोर नेते उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरून, तसेच राजस्थान प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे. या बरोबरच पायलट यांचे समर्थक विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा यांना मंत्रिपदावरून हटवण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. यानंतर पक्षाच्या कारवाईला सामोरे जाणारे सचिन पायलट यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सत्याचा छळ केला जाऊ शकतो, मात्र सत्याचा पराभव करता येत नाही, असे वक्तव्य सचिन पायलट यांनी आपल्यावर झालेल्या कारवाईनंतर व्यक्त केली आहे.
राजस्थानातील गहलोत सरकारवर संकट निर्माण झाल्यापासून बंडखोर नेते सचिन पायलट कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हते. या परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या काही समर्थक आमदारांसह दिल्ली गाठल्यानंतर राजस्थानातील राजकीय हालचालींना वेग आला. सचिन पायलट यांची नाराजी उघड झाल्यानंतर काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणालाही यश येऊ शकले नाही. यात राहुल गांधी, प्रियांका गांधी, पी. चिदंबरम, केसी वेणुगोपाळ या केंद्रीय नेत्यांचा समावेश होता.