राष्ट्रपती निवडणुकीपूर्वीच काँग्रेस सावधान, पाच आमदार चेन्नईत
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्रातील सत्ता नाट्यानंतर आता गोव्यात रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी गोव्यातील काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात होते. यानंतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीआधी पक्षांतर होण्याच्या शक्यतेमुळे गोवा काँग्रेसने ११ पैकी पाच आमदारांना चेन्नईतील रिसॉर्टवर हलवले आहे.
राष्ट्रपतीपदाची निवडणुक तोंडावर क्रॉस वोटिंग आणि पक्षांतर होण्याची भीती काँग्रेसला आहे. त्यामुळे गोवा काँग्रेसने ११ पैकी पाच आमदारांना चेन्नईला हलवले आहे. या आमदारांमध्ये काँग्रेसचे उपनेते संकल्प आमोणकर, युरी आलेमाव, रुडॉल्फ फर्नांडिस, एल्टन डिकॉस्टा आणि कार्लोस फेरेरा यांचा समावेश आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, मायकल लोबो आणि इतर सहा आमदार गोव्यातच असून गोव्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता कॉंग्रेस नेतृत्वाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
मायकल लोबोंसह ८ आमदार करणार होते भाजपमध्ये प्रवेश – माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यासह आठ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार होते. भाजपच्या हायकमांडनेही या आमदारांना पक्षात घेण्यास हिरवा कंदिल दाखवला होता. गोवा विधानसभेची सदस्यसंख्या ४० आहे. काँग्रेसकडे ११, भाजपकडे २०, एमजीपीकडे दोन आणि तीन अपक्ष आमदार आहेत.
प्रमोद सावंत यांनी फेटाळले होते वृत्त – काही दिवसांपूर्वी गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यासह पाच आमदार कॉंग्रेस सोडणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. या आमदारांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेटदेखील घेतल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, प्रमोद सावंत यांनी हे वृत्त फेटाळले होते.